; ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा
कुरखेडा (गडचिरोली):तालुक्यातील रामगड ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कथित आर्थिक भ्रष्टाचाराप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत, येत्या ५ दिवसांत चौकशी पूर्ण न झाल्यास पंचायत समितीवर ‘भव्य जनआक्रोश मोर्चा’ काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यासंदर्भात गट विकास अधिकारी, पंचायत समिती कुरखेडा यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रामगड ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका कु. अनुसया झाडू तुमडाम यांनी आर्थिक भ्रष्टाचार केल्याची तक्रार पुराव्यासह जिल्हा परिषद गडचिरोली आणि पंचायत समिती कुरखेडा येथे दाखल करण्यात आली होती. जिल्हा परिषदेकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पंचायत समिती कुरखेडा यांना देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले होते.
प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप
तक्रारदार श्री. नितीन तुळशीराम केरामी व समस्त ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे की, “जेव्हा आम्ही पंचायत समिती कार्यालयात चौकशीबाबत विचारणा करण्यास गेलो, तेव्हा समाधानकारक उत्तर मिळाले नाही. उलट चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे.” प्रशासनाच्या या भूमिकेमुळे भ्रष्टाचाराचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असून दोषींना पाठीशी घातले जात असल्याची शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
५ दिवसांचा अल्टिमेटम
प्रशासकीय स्तरावर होणारा हा विलंब संशयास्पद असून लोकशाहीसाठी घातक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. “आमच्या तक्रारीचे निवारण करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. जर ५ दिवसांच्या आत चौकशी अहवाल सादर झाला नाही, तर रामगड येथील त्रस्त जनता पंचायत समिती कुरखेडा येथे भव्य जनआक्रोश मोर्चा काढेल,” असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असेही ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.





