28 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तालुकास्तरीय तपासणी चमूकडून ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तालुकास्तरीय तपासणी चमूकडून ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक

0
80

अर्जुनी-मोर. -मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५-२६ अंतर्गत तालुका स्तरीय तपासणी चमूने ग्रामपंचायत सिरेगावबांध येथे भेट देऊन ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांची, नाविन्यपूर्ण उपक्रमांची तसेच गावातील स्वच्छता व सार्वजनिक सुविधांची सखोल पाहणी केली.
यावेळी गावातील स्वच्छ व सुंदर वातावरण, नीटनेटका परिसर, पर्यावरणपूरक उपक्रम तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून तपासणी चमूने समाधान व्यक्त करत ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक केले.
ग्रामपंचायत सिरेगावबांधच्या सर्व सदस्यांचे, कर्मचारी वर्गाचे तसेच गावातील प्रत्येक नागरिकाचे या अभियानात मोलाचे सहकार्य लाभले. ग्रामस्थांनी गावाच्या स्वच्छतेस प्राधान्य देत रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर, अंगणवाडी व ग्रामपंचायत परिसर स्वच्छ व आकर्षक ठेवण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
तसेच गावातील महिला बचत गट, युवक मंडळ आणि ग्रामस्थांनी एकजुटीने सहभाग नोंदवून गावाच्या विकासामध्ये आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. “स्वच्छ गाव – सुंदर गाव – समृद्ध गाव” या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवत ग्रामपंचायत सिरेगावबांधने विकास, स्वच्छता व लोकसहभाग यांचे उत्तम उदाहरण निर्माण केल्याचे गौरवोद्गार तपासणी चमूने यावेळी काढले.
ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आणि ग्रामपंचायतीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गाव प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी होण्यासाठी तपासणी चमूकडून शुभेच्छा देण्यात आल्या.दरम्यान, ग्रामपंचायत सिरेगावबांधच्या वतीने सर्व ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक मंडळ, कर्मचारी वर्ग तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

blank