42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ नानव्हा ग्रा.पं.ला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मूल्यमापन पथकाची भेट

नानव्हा ग्रा.पं.ला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मूल्यमापन पथकाची भेट

0
100

blank

सालेकसा : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत तालुकास्तरीय मूल्यमापनाच्या पार्श्वभूमीवर नानव्हा ग्रामपंचायतीला यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी पंचायत समितीचे मूल्यमापन पथकाने मंगळवारी भेट दिली.
ग्रामविकास विभागाने १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यभर हे अभियान राबवले होते. यामध्ये ग्रामपंचायतींच्या कामकाजाची पारदर्शकता, योजना अंमलबजावणी आणि लोकसहभाग या निकषांवर तपासणी करण्यात येते. मूल्यमापन पथकाने नानव्हा ग्रामपंचायतीच्या नोंदी, पाणीपुरवठा योजना, स्वच्छता अभियान, मनरेगा कामे आणि शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी केली. गावातील सुशासन, हरित उपक्रम आणि सामाजिक न्यायाच्या योजनांची अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आला. राज्य शासनाचा उद्देश ग्रामपंचायतींना स्वावलंबी आणि सक्षम बनवणे आहे. यासाठी सुशासनयुक्त पंचायत, जलसमृद्ध गाव आणि उपजीविका निर्मिती या सात प्रमुख घटकांवर ग्रामपंचायतींचे मूल्यमापन केले जाते. तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाच्या ग्रामपंचायतीला १५ लाख, द्वितीयला १२ लाख आणि तृतीयला ८ लाख रुपये पारितोषिक दिले जाते. स्थानिक नागरिकांनी या भेटीचे स्वागत केले असून, अभियानामुळे गावातील विकासकामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मूल्यांकन समितीमध्ये गटविकास अधिकारी रवींद्रकुमार सांगडे, विस्तार अधिकारी कैलास जाधव, गटशिक्षणाधिकारी नितेश खैरनार, तांत्रिक सहायक अभिजित जिदेवार, वरिष्ठ सहायक अमोल पहापळे, तालुका व्यवस्थापक पेसा कैलास लांडगे, तालुका व्यवस्थापक उमेद प्रदीप राठोड, पत्रकार संजय आकीलवार यांचा समावेश होता. मूल्यांकन प्रक्रियेला यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत संपूर्ण पदाधिकारी, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सीआरपी, ग्रामपंचायत परिचर, संगणक संचालक, पाणी पुरवठा कर्मचारी यांनी सहकार्य केले.

blank