***भावाच्या पत्नीच्या नावे कंत्राट : नगर पंचायत स्वीकृत सदस्य पद धोक्यात?*
*कोरची, दि. ८* : नगर पंचायत कोरची येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे स्वीकृत नगरसेवक मनोज प्यारेलाल अग्रवाल यांनी आपले सख्खे भाऊ आशिष प्यारेलाल अग्रवाल यांच्या पत्नी सौ. वर्षा आशिष अग्रवाल यांच्या नावे कामाचे कंत्राट करून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या हितसंबंध जोपासल्याचा गंभीर आरोप झाला आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम १६ व कलम ४४ नुसार नगरसेवक मनोज अग्रवाल यांना तत्काळ अनर्ह ठरविण्याची मागणी कोरची येथील सामाजिक कार्यकर्ते शालीकराम कराडे यांनी केली आहे. कराडे यांनी दि. १३ एप्रिल २०२६ रोजी पुराव्यानिशी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
*RTI अर्जाला उत्तर नाही*
तक्रारीत म्हटले आहे की, हितसंबंध सिद्ध करण्यासाठी कराडे यांनी केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ६(१) अन्वये दि. १४/०७/२०२५ रोजी जनमाहिती अधिकारी, नगर पंचायत कोरची यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. मात्र अद्यापही माहिती देण्यात आलेली नाही.
*कंत्राटाचा पुरावा*
मुख्याधिकारी, नगर पंचायत कोरची यांनी ‘वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजना २०२४-२५’ अंतर्गत वार्ड क्र. ०४ मध्ये मधुकर नखाते ते प्रभाकर कराडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकामाचा कार्यारंभ आदेश क्र. नपंको/बांध/२०८/२०२५ दि. ३०/०५/२०२५ रोजी जारी केला. हे कंत्राट सौ. वर्षा आशिष अग्रवाल यांच्या नावे असल्याचा आरोप आहे. हे कंत्राट प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हितसंबंध सिद्ध करण्यासाठी पुरेसा पुरावा असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
*काँग्रेसचे बहुमत, कमी दरात कंत्राटाचा आरोप*
स्वीकृत नगरसेवक मनोज अग्रवाल हे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष असून नगराध्यक्ष, बांधकाम सभापती व स्थायी समितीवर काँग्रेसचे बहुमत आहे. त्यांच्या प्रभावाखाली अत्यंत कमी दरात कंत्राट मंजूर करण्यात आल्याचा आरोप आहे. सौ. वर्षा अग्रवाल यांच्या नावे कंत्राट मंजूर करताना नगरसेवक अग्रवाल यांनी कोणत्याही ठरावात विरोध दर्शविला नाही, उलट समर्थन दिले, असेही तक्रारीत म्हटले आहे.
*निकृष्ट काम, आर्थिक नुकसान*
निकृष्ट दर्जाचे काम व अल्प दराच्या निविदेमुळे शासनाचे व नगर पंचायतीचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा कराडे यांनी केला आहे.
*प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबावाचा आरोप*
आशिष प्यारेलाल अग्रवाल हे एका वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी आहेत. या आधारे स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणून सोयीचा अहवाल पाठविण्यास भाग पाडत असल्याचाही आरोप तक्रारीत आहे.
*संयुक्त कुटुंबाचा दावा*
मनोज अग्रवाल व आशिष अग्रवाल हे एकत्रित आईकडे राहतात. त्यांचे रेशन कार्ड व घराची मालमत्ता टॅक्स एकत्रित आहे. आशिष अग्रवाल व पत्नी वर्षा अग्रवाल यांचा घटस्फोट झालेला नाही. ते सर्वजण संयुक्त कुटुंबात राहतात, असेही तक्रारीत नमूद आहे.
या तक्रारीमुळे कोरची तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून नगरसेवक अग्रवाल यांच्या पदावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी या प्रकरणी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





