40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home क्रीडा उन्हाळी तायक्वांदो प्रशिक्षण शिबिराचा समारोप;100 खेळाडूंना प्रमाणपत्रांचे वितरण

उन्हाळी तायक्वांदो प्रशिक्षण शिबिराचा समारोप;100 खेळाडूंना प्रमाणपत्रांचे वितरण

0
31

blank

गोंदिया, १० मे- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया, गोंदिया जिल्हा तायक्वांदो असोसिएशन आणि डीजीएम तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमी, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उन्हाळी तायक्वांदो क्रीडा प्रशिक्षण शिबिर 2025-26 चा उत्साहपूर्ण समारोप झाला. फुलचुरपेठ येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे 26 एप्रिल ते 5 मे 2026 दरम्यान हे प्रशिक्षण शिबिर पार पडले.

शिबिरात सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंसाठी 8 मे रोजी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी भोजराज चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र शासनाचा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते तथा गोंदिया जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे जिल्हा सचिव दुलीचंद मेश्राम तसेच परंपरागत युवा क्रीडा व खेळ संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय बिरणवार उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षीय भाषणात भोजराज चौधरी यांनी राज्य व केंद्र शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध क्रीडा सुविधांचा लाभ खेळाडूंनी घ्यावा, तसेच गोंदिया जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडून जिल्ह्याचे नाव उंचावावे, असे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांनीही खेळाडूंना मार्गदर्शन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रशिक्षण शिबिरात तब्बल 100 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दुलीचंद मेश्राम यांनी केले, तर संचालन प्रशिक्षक कुसुम पटले यांनी केले. कुंजन डोये यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरगम वाघाडे, आदिती ब्रह्मपुरे, हिमांशू नाईक, पूर्वान्स राऊत आणि राहुल खोब्रागडे यांनी विशेष सहकार्य केले.

blank