
फ्लोराईडयुक्त पाणी प्रतिबंधावर केले मार्गदर्शन
गोरेगाव -तालुक्यातील कन्हारटोली (पिंडकेपार) गावातील जलस्त्रोतात फ्लोराईडयुक्त पाणी गावकर्यांना पिणे लागत असल्याचे माहीती मिळाल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांचे मार्गदर्शक सुचनेनुसार दि.11 मे रोजी आरोग्य विभागाचे पथक कन्हारटोली (पिंडकेपार) गावात पोहचले व फ्लोराईडयुक्त पाणीमुळे आरोग्यावर होणारे परिणाम व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेविषयी मार्गदर्शन गावातील पदाधिकारी व गावकरी यांना दिले.यावेळी पथकामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल,गोरेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,कुर्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका हेडावु, उपकेंद्र पिंडकेपार समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.निधी चौधरी,आरोग्य सहाय्यक रवि पटले,पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे पाणी गुणवता तज्ञ मुकेश त्रिपाठी यांचे सह ग्राम कन्हारटोली (पिंडकेपार)गावचे सरंपच योगिता शहारे,उपसरपंच भरत घासले व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल यांनी यावेळी 3 पीपीएम फ्लोराईडयुक्त पाणी हे पिण्यायोग्य नसल्याचे सांगितले.फ्लोराइडयुक्त पाणी पिल्याने दात ठिसूळ व कमजोर होतात. अनेक दिवसांपर्यंत फ्लोराइडयुक्त पाण्याचा वापर केल्यास हाडे सुद्धा कमजोर होतात.याशिवाय विविध प्रकारच्या शारीरिक आजार उत्पन्न होतात त्यामुळे गाववासियांनी असे पाणी न पिता दुसर्या जलस्त्रोतांचे पाणी पिण्यासाठी वापर करावा.घरगुती ईतर वापरासाठी त्याचा वापर करण्यास हरकत नसल्याची माहिती यावेळी दिली.
गोरेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी यावेळी सदर पाणी पिण्यायोग्य नसल्याने त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने तिथे पाणी पिण्यासाठी वापर करू नये असे फलक लावण्याचे सुचना दिल्यात.पिण्याच्या पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण जास्त असल्यास (1.5 ppm पेक्षा जास्त) ‘फ्लोरोसिस‘ (Fluorosis) नावाचा आजार होऊ शकतो, ज्यामुळे दात आणि हाडांचे गंभीर विकार होतात.यामुळे, फ्लोराईडयुक्त पाण्यापासून बचाव करणे अत्यंत आवश्यक असल्याची माहीती यावेळी दिली.
फ्लोरोसिसचे परिणाम :
- दंत फ्लोरोसिस: दातांवर पांढरे, पिवळे किंवा काळे डाग पडणे आणि दात ठिसूळ होणे.
- अस्थि फ्लोरोसिस (हाडांचे विकार): सांधेदुखी, हाडे वाकडी होणे, चालण्यात अडथळे येणे आणि गंभीर प्रकरणांमध्ये पाठीच्या कण्याला बाक येणे.
सदर सभेला पिंडकेपार येथिल पदाधिकारी,पाणि गुणवत्ता विभागाचे अधिकारी, कर्मचारी,तालुका स्तरीय आरोग्य सहाय्यक,प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,उपकेंद्र पिंडकेपार येथिल सर्व कर्मचारी तसेच गावातील सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ ऊपस्थित होते.




