33.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News अतिउष्णतेमुळे वाघांचे आक्रमक वर्तन,पाणवट्याच्या शोधात जंगलातून गावाकडे

अतिउष्णतेमुळे वाघांचे आक्रमक वर्तन,पाणवट्याच्या शोधात जंगलातून गावाकडे

0
85
file photo

blank

चंद्रपूर,दि.२४ः-जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात वाढत असलेल्या वाघ-मानव संघर्षामागे केवळ ‘नरभक्षक’ प्रवृत्ती नसून तीव्र उष्णतेमुळे वाघांच्या शरीर आणि वर्तनावर होणारे परिणाम कारणीभूत असल्याचे मत वन्यजीव तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.उन्हाळ्यात तापमान ४५ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असल्याने वाघांमध्ये ‘हायपरथर्मिया’ अर्थात अतिउष्णतेमुळे निर्माण होणारा ताण वाढत असून त्यातून आक्रमक वर्तनाच्या घटना घडत असल्याचे सांगितले जात आहे.
सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाहीच्या जंगलात वाघिणीने चार महिलांना ठार केल्यानंतर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पशुवैद्यकीय अधिकारी तथा जलद बचाव पथक प्रमुख डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी यासंदर्भात वैज्ञानिक स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या मते, वाघ हे ‘होमियोथर्मिक’ प्राणी असल्याने शरीराचे अंतर्गत तापमान स्थिर ठेवणे त्यांच्यासाठी अत्यावश्यक असते. मात्र, मानवांप्रमाणे त्यांच्या शरीरात घामग्रंथी नसल्याने उष्णतेचा निचरा करण्यासाठी त्यांना प्रामुख्याने पाणवठे आणि सावलीवर अवलंबून राहावे लागते.डॉ. खोब्रागडे यांच्या मते, तापमान अतिशय वाढल्यास वाघांच्या शरीरातील उष्णता बाहेर टाकण्याची क्षमता कमी होते आणि ‘हायपरथर्मिया’ निर्माण होतो. यामुळे मध्यवर्ती मज्जासंस्थेवर ताण येऊन शरीरात ‘कॉर्टिसोल’ आणि ‘अॅड्रेनालिन’सारख्या तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सचे प्रमाण वाढते. परिणामी वाघ चिडचिडे, अस्वस्थ आणि अधिक आक्रमक बनतात.
उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलनासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक जंगलात जातात. विशेष म्हणजे, वाघ उन्हापासून बचावासाठी ज्या ओढे, सावलीचे भाग किंवा घनदाट जंगल परिसरात आश्रय घेतात, त्याच भागात तेंदूपत्ता मोठ्या प्रमाणावर आढळतो. त्यामुळे मानव आणि वाघ यांचा थेट संपर्क वाढत असल्याचे निरीक्षण आहे.तेंदूपत्ता गोळा करताना महिला आणि मजूर खाली वाकून काम करतात. वाघाची दृष्टी हालचाली आणि आकृतीवर आधारित असल्याने वाकलेली मानवी आकृती ही चारपायी प्राण्यासारखी भासू शकते. आधीच उष्णतेमुळे तणावाखाली असलेला वाघ अशा परिस्थितीत तात्काळ हल्ला करण्याची शक्यता वाढते, असेही डॉ. खोब्रागडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटत असल्याने वाघांचा मानवी वस्त्यांकडे वावर वाढत आहे. विशेषतः तरुण आणि भटक्या वाघांचा मानवांशी संपर्क अधिक वाढत असल्याचे वन विभागाचे निरीक्षण आहे. वाढती वाघसंख्या, कमी होत चाललेले अधिवास आणि तीव्र उन्हाळा यामुळे चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी परिसरातील मानव-वन्यजीव संघर्ष अधिक गंभीर बनत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे

blank