नागपूर, दि. २५: नागपूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या पेंच बहुउदेशीय प्रकल्पाच्या कालव्यांची स्वच्छता व दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ आणि प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने एकत्र येत ही कालवा स्वच्छता व दुरुस्ती मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेमुळे कालव्याच्या विसर्ग क्षमतेत वाढ होईल आणि सिंचनाची व्यवस्था सुरळीत होण्यासह पाणीबचतही निश्चितपणे होणार असल्याचा विश्वास सिंचन विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
यावर्षी सुपर अल निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे कमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार शासन स्तरावरून पाण्याचे योग्य नियोजन व पाणी बचतीसाठी गंभीर पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
पेंच प्रकल्पाच्या उजव्या, डाव्या आणि उच्च पातळी अशा ३ मुख्य कालव्यांसह १७ शाखा कालवे, ३५ वितरिका व ८२५ लघु कालवे असे एकूण ८८० कालव्यांचे सुमारे १७७९ कि.मी.चे विस्तीर्ण जाळे पसरलेले आहे. या माध्यमातून १ लाख हेक्टरपेक्षा अधिक लाभक्षेत्राला सिंचनाचा फायदा मिळतो. मात्र, वर्षानुवर्षे साचलेला गाळ, वाढलेले गवत आणि झाडीझुडपे यांमुळे कालव्यांची वहन क्षमता मंदावली होती. वेळेवर पाणी न मिळणे किंवा कालवे फुटणे, सिंचन वेळेवर न होणे, सिंचनाचा आवर्तन कालावधी वाढणे, पृष्ठभागात पाणी न पोहोचणे अशा समस्या भेडसावत होत्या. जलसंपदा विभागामार्फत यांत्रिकी मंडळाच्या संयत्राद्वारे पाखरण कार्यक्रमांतर्गत कालवा स्वच्छता मोहिम दरवर्षी राबविली जाते. तथापि, अपुरे तांत्रिक मनुष्यबळ व संयंत्रे यामुळे कालवा स्वच्छात मोहिम सर्वच ठिकाणी एकाच वेळेस राबविणे आव्हानात्मक होते.
यावर मात करण्यासाठी आता नाम फाउंडेशनच्या यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने गाळ काढणे, भराव टाकणे आणि दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. सुमारे १७४ कालव्यांची स्वच्छता होणार या मोहिमेअंतर्गत एकूण ४,१०,००० मीटर लांबीच्या १७१ कालव्यांची स्वच्छता करण्याचे नियोजन असून, २३,३०० हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे. आतापर्यंत यापैकी ४६ कालव्यांचे ६४,००० मीटर लांबीचे कालवा स्वच्छतेचे काम नाम फाउंडेशन मार्फत करण्यात आले असून, ५,३०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
सामंजस्य करार
जलसंपदा विभागाच्या विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ आणि ‘नाम फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने पेंच पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात कालवा स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यासाठी ‘सामंजस्य करार’ करण्यात आला होता. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित जलव्यवस्थापन कृषी पंधरावड्यादरम्यान या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. नाम फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकीतून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या यंत्रसामुग्रीमुळे या कामांना गती मिळाली आहे.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, अधीक्षक अभियंता सोनाली चोपडे यांच्या पुढाकाराने आणि पेंच पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता अनिता पराते यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे. जलसंपदा विभागाचे उपअभियंता राजेश पाटील, राजेश राहुलवार, विवेक झाडे, मुकुंद डांगे, सुरज बोरेले, दिलीप भागवतकर, रोशन नरड तसेच नाम फाउंडेशनचे राज्य समन्वयक राजाभाऊ शेळके व दत्तात्रय गरजे या कामासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
पेंच पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता अनिता पराते यांनी सांगितले की, या कालवा स्वच्छता मोहिमेमुळे कालव्यांची विसर्ग क्षमता वाढून सिंचन सुरळीत होईल आणि पाण्याची मोठी बचत होईल. ही कामे दर्जेदार स्वरुपात व्हावीत, असे आमचे प्रयत्न आहेत. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील मौजा पिंपरी येथील शेतकरी भाऊराव किरपान यांनी सांगितले की, कालवा स्वच्छता मोहिमेमुळे पाण्याचा प्रवाह सुधारून याचा थेट फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे. जलसंपदा विभाग आणि नाम फाउंडेशन यांनी संयुक्तपणे राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. भविष्यातही अशा कामांना प्राधान्य दिल्यास शेतकऱ्यांना मोठी मदत होईल.





