गोंदियात पेट्रोलपंपासमोर घोषणाबाजी; दरवाढ मागे घेण्याची मागणी
गोंदिया ः मागील अकरा दिवसांत पेट्रोल व डिझेलच्या किमती आठ रुपये प्रतिलिटरने वाढवण्यात आल्या आहेत. ही दरवाढ आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी असल्याचा आरोप करीत जिल्हा काॅंग्रेस कमिटीने बुधवारी (ता. २७) येथील जयस्तंभ चाैकातील गाैरी शंकर पेट्रोलपंपासमोर आंदोलन केले. सरकारविरोधात घोषणाबाजी करून दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.
गेल्या १२ वर्षांत पेट्रोलच्या किमती २८ टक्क्यांनी, तर डिझेलच्या किमती ६२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या कार्यकाळात कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर्स प्रती बॅरलपर्यंत गेलेले असतानाही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ७२ रुपये लिटरच्या वर जाऊ दिल्या नव्हत्या. मात्र, मागील काही वर्षांत कच्च्या तेलाचा भाव ५०-५५ डॉलर प्रती बॅरलच्या आसपास असतानाही पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या आसपास होते.
गेल्या १२ वर्षांत केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवरील कर व उत्पादन शुल्काच्या माध्यमातून जनतेच्या खिशाला कात्री लावली आहे. अलीकडील दरवाढीमुळे तेल कंपन्यांनी हजारो कोटी रुपयांचा नफा कमावला असून, ही नफेखोरी जनतेच्या खिशावर दरोडा टाकणारी आहे.
पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्य जनतेवर मोठा परिणाम होत आहे. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दरदेखील वाढत असून, महागाई अधिक तीव्र होत आहे. उत्पन्न न वाढता खर्च वाढत असल्याने सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे.
शेतीची कामे करण्यासाठी ट्रॅक्टर व इतर यंत्रसामुग्रीसाठी डिझेल अत्यावश्यक आहे. अनेक ठिकाणी डिझेलचा पुरवठा विस्कळीत झाल्याने शेतीची कामे अडचणीत आली आहेत. त्यामुळे शेती उत्पादनावर परिणाम होऊन भविष्यात आणखी महागाई वाढण्याची शक्यता आहे. असे काॅंग्रेसने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.आंदोलनात काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमर वराडे, महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे सचिव विनोद जैन, पी. जी. कटरे, माजी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.





