26 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home गुन्हेवार्ता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला ट्रक चालकाचा मृतदेह

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला ट्रक चालकाचा मृतदेह

0
560

गोंदिया – गोंदिया-आमगाव महामार्गावरील ठाणा गावाजवळच्या माही ढाबा परिसरात एका ट्रक चालकाचा संशयास्पद मृतदेह ट्रकच्या दोरखंडाला बांधलेल्या अवस्थेत बुधवारी (ता. २७ ) सकाळी आढळून आला. गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला असला तरी शरीरावरील जखमा, रक्ताचे डाग आणि घटनास्थळावरील परिस्थिती पाहता घातपाताची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चांना उधाण आले असून, आमगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
केशव भजनूलाल उईके (वय २४, रा. बारबती, जि. शिवनी, मध्य प्रदेश) असे मृताचे नाव आहे. संबंधित ट्रकचा क्रमांक सीजी ०४/ एल. आर. ३३९२ असा असून, गोबरवाही (तुमसर) येथून गूळ भरून हा ट्रक ओडिशाकडे रवाना झाला होता. मात्र, ओडिशाकडे आमगाव-देवरीमार्गे जाणारा ट्रक आमगावच्या दिशेने येत असताना ही घटना घडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ट्रक चालकाचा मृतदेह ट्रकच्या दोरखंडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या गळ्यावर तसेच पायांवर जखमा दिसून आल्या असून शरीरावर रक्त पडल्याचेही आढळले. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यांसारखी परिस्थिती दिसून आल्याने ही केवळ आत्महत्या नसून घातपात असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मृतदेहातून तीव्र दुर्गंधी येत असल्याने मृत्यू काही तासांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
या ट्रकचे मालक शिवदयालसिंग रामसिंग ठाकूर (वय ६२, रा. हुडकेश्वर, नागपूर) असल्याचे समोर आले असून, पोलिसांकडून त्यांच्याकडूनही माहिती घेतली जात आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक पथक तसेच डॉग स्कॉडला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. आमगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सखोल पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी गोंदिया येथील केटीएस रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

blank