गोंदिया, दि. २ जून : शहरातील गोविंदपूर परिसरात मंगळवारी दुपारी ११ वाजता च्या सुमारास प्लास्टिक बारदाना कारखाना, गुडाखू फॅक्टरी आणि मित्तल ट्रेडर्स यांच्या गोडाऊनमध्ये लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.आगीचे स्वरूप इतके भीषण होते की, घटनास्थळावरून निघणारे धुराचे प्रचंड लोट जवळपास एक किलोमीटर अंतरावरूनही स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, गोडाऊनमधील मोठ्या प्रमाणातील ज्वलनशील साहित्यामुळे आगीने झपाट्याने रौद्ररूप धारण केले. आगीत गोदामांमधील जवळपास सर्वच साहित्य जळून खाक झाले असून मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळपर्यंत अग्निशमन दलाने सुमारे ५० टक्के आग नियंत्रणात आणल्याची माहिती मिळाली.
घटनेदरम्यान परिसरातील नागरिकांनीही खबरदारी घेत सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. विशेष म्हणजे, या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, धूर आणि उष्णतेमुळे परिसरातील नागरिकांना काही काळ त्रास सहन करावा लागला.





