गोंदिया : आरटीओ कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी (दि. ९) एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. गोंदिया येथील आरटीओ कर्मचाऱ्यांनी कार्यालयासमोर निदर्शने करून त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. तसेच शासनाने यानंतरही शासनाने तोडगा काढला नाही, तर १६ जूनपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. यामुळे वाहन परवाने, वाहन नोंदणी, कर भरणा यासह सर्व आरटीओ सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे.
संघटनेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार मोटार वाहन विभाग आणि शासन यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर तोडगा न निघाल्याने आंदोलनाचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे. सेवा प्रवेशोत्तर नियम प्रलंबित २३ सप्टेंबर २०२२ रोजी शासनाने विभागाचा कृतिबंध मंजूर केला आहे. मात्र, आजतागायत सेवा प्रवेशोत्तर नियम तयार झालेले नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. विभागातील ५६ कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली पदोन्नती रद्द करून त्यांना पदावनत करण्यात आले आहे.
कालबद्ध पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना, वर्ग-२ प्रशासकीय अधिकारी पदावरील पदोन्नती, तसेच प्रतिनियुक्तीवरील बदल्या या विविध मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ३ जून रोजी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने पुन्हा तांत्रिक मुद्दे उपस्थित करून प्रश्न लांबणीवर टाकला, असा आरोप संघटनेने केला आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास १६ जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.





