39.2 C
Gondiā
Wednesday, June 10, 2026
Home विदर्भ अहेरी येथील घटनेच्या निषेधार्थ न.पं. कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

अहेरी येथील घटनेच्या निषेधार्थ न.पं. कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

0
32

… निवेदनातून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी…

अर्जुनी मोरगाव-गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपरिषदमध्ये कार्यरत कर अधिकारी वैभव पांढरे याच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नगरपंचायत अर्जुनी येथील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. मुख्याधिकारी ज्ञानेश सोनवाणे यांना निवेदन देत हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, बुधवारला (10) कर अधिकारी पांढरे नेहमीप्रमाणे कार्यालयात काम करीत असताना त्यांच्यावर अचानक आरोपी अजय कंकडलवार व त्याच्या साथीदारांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला.पांढरेला धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली यामध्ये ते जबर जखमी झाले.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील व दुर्गम भागात शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा बजावणे मोठे आव्हान आहे.अशा ठिकाणी नेहमी कर्मचाऱ्यांची कमतरता असते.संवर्ग अधिकारी व कर्मचारी अल्प संख्येने कार्यरत असतात.आपल्या जीवाची पर्वा न करता कुटुंबापासून दूर राहून प्रशासकीय जबाबदारी पार पाडतात.अशा विपरीत परिस्थितीत सेवा देत असताना कर्मचाऱ्यांवरील जीवघेणे हल्ले ही अत्यंत गंभीर व दुर्दैवी बाब आहे.
या हल्यातील दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी.आरोपीला त्वरित अटक करून कठोर शिक्षा मिळावी. प्रशासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत सुरक्षितता प्रदान करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
नगरपरिषद संवर्ग संघटना, नगरपरिषद व नगरपंचायत आस्थापनेतील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी या प्रसंगी एकजुटीने आपल्या सहकाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. हा केवळ एका कर्मचाऱ्यावर झालेला हल्ला नसून संपूर्ण प्रशासन व्यवस्थेवरील हल्ला आहे.वैभव पांढरे यांच्यावरील प्रसंग भविष्यात कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्यावर येऊ शकतो.त्यामुळे हा लढा केवळ एका व्यक्तीसाठी नसून प्रशासनातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याच्या सन्मान, सुरक्षितता आणि स्वाभिमानासाठी असल्याचे तीव्र संवेदना आंदोलक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.यावेळी कर व प्रशासकीय अधिकारी दिलीप उईके, अभियंता निखिल बंड, लेखापाल एकनाथ चव्हाण, नगर रचना सहाय्यक प्रेरणा बाविस्कर, लिपिक शुभम गौरकार, दीप्ती भाजीपाले,दुर्योधन नेवारे, ऋषभ पांडे, दीपक डोंगरवार, मनीषा मेश्राम, दीपक राऊत, महेश राऊत,शिल्पा खांडेकर, अश्विनी शहारे उपस्थित होते.