33.7 C
Gondiā
Sunday, June 28, 2026
Home महाराष्ट्र मुंबई-गोवा महामार्गावर ‘तळकांटे सप्तलिंगी ते बावनदी’ वृक्षारोपणाचा शुभारंभ

मुंबई-गोवा महामार्गावर ‘तळकांटे सप्तलिंगी ते बावनदी’ वृक्षारोपणाचा शुभारंभ

0
4
महामार्ग ‘हरित’ करण्याचा पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांचा निर्धार
​रत्नागिरी, दि. २८ – मुंबई-गोवा महामार्गाच्या विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महामार्गावरील ‘तळकांटे सप्तलिंगी ते बावनदी’ या मार्गावर दुतर्फा वृक्षारोपण करण्याच्या विशेष उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
​यावेळी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री डाॕ सामंत यांनी उपस्थित ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधत या कौतुकास्पद उपक्रमाचे कौतुक केले.
​विकास आणि पर्यावरणाचा समतोल गरजेचा: डाॕ उदय सामंत
​”केवळ रस्ते बांधणे हाच एकमेव उद्देश नाही, तर महामार्गाच्या विकासासोबतच निसर्गाचा समतोल राखणे आणि या परिसराचे सौंदर्य वाढवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. विकास होत असताना पर्यावरणाची हानी टाळणे किंवा ती भरून काढणे तितकेच गरजेचे आहे. आसे पालकमंत्री डाॕ सामंत यावेळी म्हणाले.​पुढे ते म्हणाले, महामार्ग तयार करताना ज्या झाडांची हानी झाली, त्याची भरपाई म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जात आहे. हा मार्ग ‘हरित महामार्ग’ (Green Highway) करण्याचा शासनाचा निर्धार असून, सर्वांच्या सहकार्याने हा संपूर्ण परिसर अधिक सुंदर आणि हिरवागार बनेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
​या पर्यावरणपूरक उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी बंड्याशेठ साळवी, अभिजित हेगशेट्ये, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, तळकांटे गावच्या सरपंच सुषमा बने, प्रांताधिकारी जीवन देसाई आणि शरद कदम यांच्यासह तळकांटे गावचे ग्रामस्थ व निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.