शेगाव,दि.२८ः- श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातील पेढा विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने शनिवारी (दि. २७) धडक कारवाई केली. भाविकांना विकल्या जाणाऱ्या पेढ्यांच्या गुणवत्तेबाबत प्राप्त तक्रारींची गंभीर दखल घेत अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंदिर परिसरातील प्रमुख पेढा विक्री केंद्रांची तपासणी केली.
या कारवाईत दोन दुकानांवर कारवाई करण्यात आली असून पेढ्यांचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी जप्त करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून मंदिर परिसरातील काही दुकानांमध्ये विक्री होणाऱ्या पेढ्यांच्या गुणवत्तेबाबत भाविकांकडून अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त होत होत्या. त्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे, अक्षय भोपाळे आदींच्या पथकाने मंदिर परिसरातील चार ते पाच प्रमुख पेढा विक्री केंद्रांवर एकाचवेळी छापे टाकले. तपासणीदरम्यान दोन दुकानांवर कारवाई करण्यात आली. विविध प्रकारच्या पेढ्यांचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी जप्त करण्यात आले असून पेढा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, उत्पादन प्रक्रिया, स्वच्छता आणि साठवणुकीच्या पद्धतीचीही सखोल पाहणी करण्यात आली.
अन्न सुरक्षा विभागाने जप्त केलेले नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. मंदिर परिसरात दररोज हजारो भाविक येत असल्याने प्रसाद व खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला असून अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.





