33.8 C
Gondiā
Monday, June 29, 2026
Home Top News काही मंत्र्यांची सुट्टी; नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता!

काही मंत्र्यांची सुट्टी; नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता!

0
74

केंद्रातील मोदी सरकारमध्ये लवकरच मोठा मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुका आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकीच्यापार्श्वभूमीवर या बदलांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राष्ट्रपती भवनातील बैठकांनंतर मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना वेग आला आहे. मात्र, या बदलांबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

कोणत्या मंत्र्यांच्या पदावर परिणाम होण्याची शक्यता?

मंत्रिमंडळ फेरबदलात काही मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाऊ शकतो. काही मंत्र्यांना संघटनात्मक जबाबदारी दिली जाण्याची शक्यता असून, काही मंत्र्यांची खाती बदलली जाऊ शकतात.केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव चर्चेत आहे. राष्ट्रीय प्रवेश परीक्षांशी (NEET) संबंधित वादांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मंत्रालयाबाबत बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्याबाबतही फेरबदलाच्या चर्चा सुरू आहेत. त्यांना संघटनेत किंवा अन्य जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.याशिवाय, ज्या मंत्र्यांची कामगिरी असमाधानकारक आहे किंवा ज्या राज्यांमध्ये आगामी काळात निवडणुका आहेत, तिथले समीकरण साधण्यासाठी काही कनिष्ठ मंत्र्यांनाही डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे.

नव्या चेहऱ्यांना मिळू शकते संधी

मंत्रिमंडळ विस्तारात काही नवीन नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील राजकीय समीकरण लक्षात घेता खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. महायुतीचे समीकरण मजबूत करण्यासाठी त्यांना केंद्रात स्थान मिळू शकते, अशी चर्चा आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव शक्तिकांत दास यांचे नावही संभाव्य मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. त्यांना अर्थव्यवस्थेशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘रामायण’ मालिकेतील भूमिकेसाठी प्रसिद्ध आणि भाजप खासदार अरुण गोविल यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता चर्चेत आहे.

काही मंत्र्यांना मिळू शकते प्रमोशन

मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांच्या कामगिरीच्या आधारे त्यांना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह काही नेत्यांना कॅबिनेट स्तरावर अधिक महत्त्वाची भूमिका मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांच्या खात्यात बदल होणार का, याकडेही लक्ष लागले आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या संभाव्य एक्झिटनंतर, शिक्षण खात्याची धुरा निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपवली जाऊ शकते, अशीही दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.