गोंदिया:अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध नोंदवत भव्य मोर्चा व सत्याग्रह आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.
उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांची जाहीर सभा पार पडल्यानंतर, हिंदुत्ववादी व दक्षिणपंथी संघटनांनी त्या सभास्थळाचे गंगाजलाने ‘शुद्धीकरण’ केल्याचा प्रकार समोर आला आहे. खडगे यांच्या उपस्थितीमुळेच ते स्थान अपवित्र झाल्याचा आरोप करत हे अनुष्ठान करण्यात आले. हा प्रकार अत्यंत चिंताजनक, निंदनीय व प्रतिगामी असल्याची टीका काँग्रेस पक्षाकडून करण्यात येत आहे.
घटना ही संविधानावर आणि मानवी मूल्यांवर आघात
हा लाजीरवाणा प्रकार केवळ काँग्रेस अध्यक्षांचा अपमान नसून, देशातील करोडो नागरिकांचा आणि संविधानाने दिलेल्या समानता, बंधुत्व, सामाजिक न्याय व मानवी सन्मानाचा थेट अपमान आहे. भारतीय संविधानाच्या आधारावर चालणाऱ्या लोकशाही समाजात अशा भेदभावाची आणि जातीयवादी मानसिकतेची कोणतीही जागा असू शकत नाही. असा कोणताही प्रकार काँग्रेस पक्ष आणि देशातील जनता कदापि सहन करणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला.
बापू आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलन
या घटनेच्या निषेधार्थ गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जयस्तंभ चौकात जोरदार घोषणाबाजी करत परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले आणि पुतळ्यासमोरच सत्याग्रह आंदोलन केले.
“देश मनूवादी विचारसरणीने नाही, तर संविधानानेच चालेल!”
“भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे स्पष्टपणे लक्षात ठेवावे की, हा देश कोणत्याही मनूवादी विचारसरणीने चालणार नसून केवळ संविधानाच्या आधारावरच चालेल,” असा इशारा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अमर वराडे यांनी या प्रसंगी दिला.
तसेच, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे हे दलित समाजाचे प्रतिनिधी असल्यानेच भाजपशी संबंधित संघटनांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केले असल्याचा गंभीर आरोपही काँग्रेस नेत्यांनी केला.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या आंदोलनात जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात पी. जी. कटरे, राजकुमार पुराम, सुनील भालेराव, वंदना काले,राजकुमार पटले, जीवन शरणागत, रणजीत गणवीर, मनोज पटनायक, राजभाऊ दोनोडे, विजय फुंडे, आशुतोष साथी, चंद्रकुमार चुटे, अमर रंगारी, ओम पटले, मनीष मेश्राम, देवेंद्र रहांगडाले, शैलेश बहकार, विनोद मडावी, रवी चुटे, रंजीत कासम, प्रल्हाद सलामे, कुलदीप गुप्ता, सावंत राऊत, उत्तम साखरे, अविनाश टेंबरे, प्रदीप राऊत, श्याम गणवीर, सूर्यप्रकाश भगत, अंकेश हरिणखेड़े, अनीता मुनेश्वर, विष्णू नागरीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.





