24.3 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home महाराष्ट्र गोदामात साठवलेल्या हळदीची अन्न औषध प्रशासन विभागाने चौकशी करावी-राजू शेट्टींची मागणी

गोदामात साठवलेल्या हळदीची अन्न औषध प्रशासन विभागाने चौकशी करावी-राजू शेट्टींची मागणी

0
58
मुंबई ( प्रतिनिधी )-राज्यातील एनसीडीईएक्स (NCDEX ) च्या गोदामात निकृष्ट दर्जाची हळद ठेवून नियमांचे उल्लंघन करून हळदीचे दर पाडले जात आहेत. यामुळे राज्यातील संबंधित गोदामात असलेल्या हळदीचे अन्न औषध प्रशासन विभागाकडून चौकशी करून कारवाई करावी. तसेच शालेय पोषण आहार व कारागृहातील कैद्यांना पुरविण्यात येणाऱ्या आहार तसेच रेशन व कॅंन्टीनमधील वस्तुंची तपासणी करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांचेकडे केली.
राज्यातील सांगली व हिंगोली जिल्ह्यातील एनसीडीईएक्स च्या गोडावून मध्ये निकृष्ट दर्जाची हळद ठेवून हळदीचे दर पाडले जात आहेत. एनसीडीईएक्स च्या निकषानुसार हळदीच्या दर्जावर हळदीचा दर असतो मात्र प्रत्यक्षात गोडावूनमध्ये निकृष्ठ हळद ठेवून त्याचे दर पाडले जात आहेत. यामुळे संपुर्ण राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होवू लागले आहे. यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यातील एनसीडीईएक्स च्या सर्व गोडावून वरती धाडी टाकून निकषानुसार व मानकानुसार हळद आहे का याची तपासणी करण्याची मागणी केली आहे.
त्याबरोबरच राज्यातील शालेय माध्यान्ह भोजनाच्या निकृष्ट दर्जा व भेसळीबाबत जिल्ह्यानिहाय विशेष तपासणी मोहीम राबवून विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या शालेय पोषण आहाराची तपासणी करण्यात यावी. राज्यातील कारागृहात कैद्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराचा दर्जा निकृष्ट असून याबाबत कैद्यांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. कैद्यांना दिले जाणारे आहाराबरोबर रेशन व कॅंन्टीन विभागातील खरेदी केलेल्या वस्तू दुय्यम दर्जाच्या असतात यामुळे या सर्व गोष्टींमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाने तात्काळ तपासणी करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी राज्याचे अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तातडीने तीनही विभागाला सुचना देवून तातडीने कारवाई बाबत संबंधितांना आदेश दिले.