26.8 C
Gondiā
Tuesday, July 7, 2026
Home क्रीडा जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

0
11

उत्कृष्ट खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा कार्यकर्त्याचा होणार गौरव

 भंडारा, दि. 07 : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरण 2001 अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने सन 2025-26 या पुरस्कार वर्षासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता तसेच दिव्यांग गुणवंत खेळाडू यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य क्रीडा दिनानिमित्त या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रुपये 10 हजार असे असून पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत.

पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे महाराष्ट्रात सलग 15 वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. क्रीडा मार्गदर्शकाने महाराष्ट्रात किमान 10 वर्षे सातत्याने क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केलेले असावे तसेच त्याचे वय 30 वर्षे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. गुणांकनासाठी संबंधित जिल्ह्यातील खेळाडूंचीच कामगिरी ग्राह्य धरली जाणार आहे.

दिव्यांग गुणवंत खेळाडू व गुणवंत खेळाडूंनी पुरस्कार वर्षासह लगतच्या मागील पाच वर्षांपैकी किमान दोन वर्षे त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केलेले असावे. एका जिल्ह्यात जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त झालेली व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात त्याच पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही. तसेच एकाच खेळात किंवा एकाच प्रवर्गात एकदा पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्तीस त्याच खेळात किंवा प्रवर्गात पुन्हा पुरस्कार मिळणार नाही.

पुरस्कार वर्षाची गणना 1 जुलै ते 30 जून या कालावधीनुसार करण्यात येणार असून अर्जासोबत सादर करण्यात आलेली प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रांची अनावश्यक पुनरावृत्ती करू नये.

इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज, अटी व शर्ती तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, भंडारा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. परिपूर्ण व सीलबंद अर्ज दि. 24 जुलै 2026 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लतिका लेकुरवाळे यांनी केले आहे.