27 C
Gondiā
Wednesday, July 8, 2026
Home विदर्भ सफाई कामगारांचे नगर परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलनाचे हत्यार

सफाई कामगारांचे नगर परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलनाचे हत्यार

0
124

सफाई कामगारांच्या नगरपरिषद मुख्याधिकार्‍यांना निवेदन

तुमसर (प्रतिनिधी): शहर चकाचक ठेवणाऱ्या नगर परिषद तुमसर येथील कंत्राटी सफाई कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून, गेल्या आठ दिवसापासून सफाई कामगार संपावर असून त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आता कंत्राटी कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मागील दोन महिन्यांचे थकीत वेतन मिळावे, किमान वेतन कायदा लागू करावा आणि EPFO-ESIC चा लाभ द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी स्वराज्य युवा एकता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांच्या नेतृत्वात नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांना एक जाहीर इशारा निवेदन सादर करण्यात आले. यावेळी नगरसेविका रोशनी भोंडेकर, रेखा चकोले, नगरसेवक गुलराज कुंदवाणी प्रामुख्याने उपस्थित होते.
सफाई कामगारांचे मागण्या मान्य न झाल्यास नगर परिषदेसमोर १० जुलै पासून बेमुदत आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.तुमसर नगर परिषदेअंतर्गत सध्या ६० कंत्राटी सफाई कामगार जीवाची पर्वा न करता शहराच्या स्वच्छतेचे काम पाहत आहेत. मात्र, प्रशासनाकडून आणि कंत्राटदाराकडून त्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सध्या पावसाळा सुरू झाला असूनही कामगारांना रेनकोट, गमबूट, हातमोजे, मास्क किंवा ओळखपत्र यांसारखे कोणतेही सुरक्षा साहित्य पुरविण्यात आलेले नाही. यामुळे कामगारांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.

सफाई कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ!
कामगारांना अत्यंत कमी मजुरी दिली जात असून, त्यातही मागील दोन महिन्यांपासून हक्काचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांचे जगणे असह्य झाले असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच, त्यांच्या वेतनातून EPFO (भविष्य निर्वाह निधी) आणि ESIC (वैद्यकीय विमा) कपात केली जात नसल्याने त्यांना भविष्यकालीन आणि आरोग्याच्या सुरक्षा कवचापासून वंचित राहावे लागत आहे.
निवेदन सादर करताना कंत्राटी कामगार प्रतिनिधी गोविंद श्रीराम भोंडेकर, अजय कनोजे, शुभम राऊत, राहुल गजभिये, रवी कनोजे, संदीप आलमकर, प्रदीप बाम्हणे, प्रमोद बर्वे, पांडुरंग कुंभलकर, मुकेश मालाधरे, निखिल भवसागर, अश्विन भोंगाडे, नितीन कडवं, फिरोज पठाण, भोजराज मालाधरे, सलीम पठाण, संजय सहारे यांच्यासह मोठ्या संख्येने कंत्राटी सफाई कामगार उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी भंडारा, तहसीलदार तुमसर आणि पोलीस निरीक्षक तुमसर यांनाही देण्यात आल्या आहेत.

“शहराचे आरोग्य सांभाळणाऱ्या कामगारांच्या हक्कांवर गदा आणली जात आहे. प्रशासनाने तात्काळ नियमानुसार किमान वेतन लागू करून दोन महिन्यांची थकबाकी द्यावी. अन्यथा कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी नगर परिषदेसमोर १० जुलै पासून तीव्र स्वरूपाचे बेमुदत आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल.”
–अमित मेश्राम, संस्थापक अध्यक्ष, स्वराज्य युवा एकता फाऊंडेशन तुमसर, जिल्हा भंडारा.

संबंधित कंत्राटदारांनी सफाई कामगारांची पिळवणूक केली असेल आणि नियमाचे उल्लंघन केले असेल तर ठेकेदारावर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि त्यांची सुरक्षा ठेव जप्त करण्यात येईल.
–मंगेश वासेकर, प्रभारी मुख्याधिकारी, नगरपरिषद तुमसर.