हजारोंच्या संख्येने शिक्षकांची उपस्थिती; शासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर
गोंदिया-शिक्षक कृती महासंघ, जिल्हा गोंदियाच्या नेतृत्वाखाली आज (दि. ९ जुलै २०२६) आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला जिल्हाभरातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हजारोंच्या संख्येने शिक्षकांनी उपस्थित राहून शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.आंदोलनादरम्यान शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन विविध घोषणाबाजी करत आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. यावेळी मुख्यमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात १ एप्रिल २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटी संदर्भातील न्यायालयीन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी, शिक्षकांना BLO व इतर अशैक्षणिक कामांतून मुक्त करणे, संचमान्यता विषयक अन्यायकारक निर्णय रद्द करणे, विद्यार्थी हितासाठी तातडीने शिक्षक भरती करणे,शिक्षक सरसकट वेतनश्रेणी लागू करणे तसेच शिशुसेवक योजना रद्द करून नियमित शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करणे अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
यावेळी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हा लढा केवळ शिक्षकांचा नसून ग्रामीण शिक्षण, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि शाळांचे अस्तित्व वाचविण्यासाठीचा आहे. शासनाने सकारात्मक भूमिका घेत मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.या आंदोलनात जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले असून शिक्षकांच्या अभूतपूर्व एकजुटीचे दर्शन यावेळी घडले.
यावेळी समन्वयक एस यू वंजारी,शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष संदीप तिडके,विभागीय अध्यक्ष किशोर डोंगरवार,शिक्षक भारती विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्रम्हणकर,जिल्हाध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ ओ एस बिसेन,जिल्हाध्यक्ष कास्ट्राइब संघटना संजय उके,जिल्हाध्यक्ष हरिराम येरणे पुरोगामी संघटना, शुशील बंसोड अध्यक्ष , राज कडव माजी जिल्हाध्यक्ष जुनी पेन्शन संघटना,जयेश लिल्हारे सचिव जुनी पेन्शन संघटना,संदीप मेश्राम,सुरेंद्र भैसारे,संतोष डोंगरे अशोक बिसेन ,ममता येडे,ममता चुटे,मीनाक्षी पंधरे यासह बहुसंख्येने शिक्षक कृती महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.





