29.3 C
Gondiā
Thursday, July 9, 2026
Home महाराष्ट्र लोकसंख्येच्या प्रमाणात महाज्योतीला १,५०० कोटींचा निधी द्या..आमदार फुके विधानपरिषदेत गरजले

लोकसंख्येच्या प्रमाणात महाज्योतीला १,५०० कोटींचा निधी द्या..आमदार फुके विधानपरिषदेत गरजले

0
11

ओबीसी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी डॉ. परिणय फुके यांची विधान परिषदेत जोरदार मागणी

मुंबई,दि.०९ : महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांना १,५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी आज विधान परिषदेत केली. महाज्योतीला सध्या मिळणारा निधी ओबीसी समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत अपुरा असून, शासनाने याबाबत दिलेल्या आश्वासनाची तातडीने पूर्तता करावी, अशी मागणीही त्यांनी केली.विशेष म्हणजे महाराष्ट्रात सकल ओबीसी महामोर्चा,ओबीसी जनमोर्चा,ओबीसी संघर्ष समिती व ओबीसी अधिकार मंचच्यावतीने सातत्याने महाज्योती संस्थेला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी देण्याची मागणी आंदोलन व निवेदनातून करण्यात येत आहे,त्याची दखल आमदार डाॅ.फुके यांनी घेत विधानपरिषदेत आपला आवाज बुलंद केल्याचे आज बघावयास मिळाले.

महाज्योतीला मिळणाऱ्या निधीबाबत नाराजी व्यक्त करताना डॉ. फुके म्हणाले की, राज्य शासनाकडून सारथी, बार्टी आणि महाज्योती या तिन्ही संस्थांना जवळपास समान निधी दिला जातो. मात्र सारथी ही संस्था सुमारे १६ टक्के मराठा समाजासाठी, बार्टी ही संस्था १३ टक्के अनुसूचित जाती समाजासाठी, तर महाज्योती ही संस्था राज्यातील जवळपास ६० टक्के ओबीसी समाजासाठी कार्यरत आहे. ओबीसी समाजात साडेतीनशेहून अधिक जातींचा समावेश असून सुमारे ७ कोटी नागरिकांच्या शैक्षणिक व कौशल्य विकासाची जबाबदारी महाज्योतीवर आहे. अशा परिस्थितीत इतर संस्थांइतकाच निधी देणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. फुके यांनी सभागृहात सांगितले की, मागील अधिवेशनात महाज्योतीला १,५०० कोटी रुपयांचा निधी देण्याबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेतली होती. तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लोकसंख्येच्या प्रमाणात निधी देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे शासनाने आता विलंब न करता महाज्योतीला १,५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी त्यांनी ठाम मागणी केली.या चर्चेला उत्तर देताना इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी महाज्योतीचा निधी १,५०० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे.तसेच अंतिम मंजुरी अद्याप मिळालेली नसली तरी आतापर्यंत महाज्योतीसाठी ७२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगितले.त्यापैकी ४९९ कोटी रुपये विविध योजनांच्या अनुदानासाठी, १ कोटी रुपये वेतनासाठी, तर नागपूर येथे महाज्योतीची प्रशासकीय इमारत व वसतिगृह तसेच नाशिक येथे वसतिगृह उभारणीसाठी २२८ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मंत्री सावे यांनी महाज्योतीमार्फत ६,९०० प्रशिक्षणार्थी तसेच १४ हजार विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणासाठी प्रशिक्षण आणि सहाय्य दिले जात आहे. पीएच.डी. विद्यार्थ्यांनाही अनुदान देण्यात येत असून, संस्थेच्या माध्यमातून यूपीएससीमध्ये १००, एमपीएससीमध्ये ३७१, तसेच लष्कर, बँकिंग आणि इतर विविध क्षेत्रांत सुमारे २ हजार विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.

महाज्योतीच्या बळकटीकरणाचा मुद्दा आमदार डॉ. परिणय फुके यांनी यापूर्वीही सातत्याने विधान परिषदेत उपस्थित केला आहे. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण, कौशल्य विकास आणि परदेशी शिक्षणासाठी अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महाज्योतीला लोकसंख्येच्या प्रमाणात भक्कम आर्थिक तरतूद करणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी वेळोवेळी मांडली आहे.यावेळीही त्यांनी शासनाला मागील आश्वासनाची आठवण करून देत, ओबीसी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी महाज्योतीला १,५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी जोरदारपणे लावून धरली.