30.1 C
Gondiā
Sunday, July 12, 2026
Home गुन्हेवार्ता धावत्या मेमू लोकलमधून ढकलून महिलेची हत्या

धावत्या मेमू लोकलमधून ढकलून महिलेची हत्या

0
8

गोंदिया : रेल्वेतून प्रवास करीत असलेल्या महिलेला जाणीवपूर्वक ढकलून तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी (दि. ९) सायंकाळी ७:०५ ते ७:३० वाजतादरम्यान ग्राम गणखैरा येथील रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे पोल क्रमांक १००९/१५ समोरील रेल्वे ट्रॅकवर हा प्रकार घडला. ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत घडलेल्या या प्रकारात सुरुवातीला अपघाती मृत्यू मानले जात होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमुळे या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे.
रितू विनायक धमगाये (४३, रा. गणखैरा, गोरेगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. रितू धमगाये या नेहमीप्रमाणे गोंदिया-वडसा मेमू लोकल (क्रमांक ६८८०६) मधून प्रवास करीत होत्या. कामावरून घरी परतण्यास उशीर झाल्याने तिचा भाऊ मंगेश विनायक धमगाये याने तिचा शोध घेतला. दरम्यान, गुरुवारी (दि. ९) गणखैरा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाशेजारी रितूचा मृतदेह आढळला असता ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला. तपासादरम्यान शुक्रवारी (दि. १०) येथील रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फूटेजची पाहणी केली असता त्यात एक अनोळखी व्यक्ती रितू धमगाये यांचा हात जबरदस्तीने पकडून धावत्या मेमू लोकलच्या डाव्या बाजूच्या दारातून बाहेर ढकलत असल्याचे त्यात स्पष्टपणे आढळून आले.

असा होता खून करणारा आरोपी
सीसीटीव्हीतील आरोपीचे वर्णनही पोलिसांनी जाहीर केले आहे. यात आरोपीचा बांधा मजबूत, सावळा वर्ण, काळे केस, काळा टी-शर्ट, काळी पँट, गळ्यात केशरी रंगाचा दुपट्टा, चेहऱ्यावर दाढी-मिशी तसेच त्याचे वय ४० ते ४५ वर्षे असल्याचे दिसते. ग्रामीण पोलिसांनी अनोळखी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक वीरेंद्र भोसले करीत आहेत.

सीसीटीव्हीत काय आढळले ?
तपासादरम्यान मिळालेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये रितू रेल्वेच्या डब्यात प्रवास करताना दिसत असून, काही वेळाने एक अनोळखी युवक तिच्याजवळ येतो व तिचा हात पकडून दाराकडे ओढतो आणि धावत्या रेल्वेतून जबरदस्तीने बाहेर ढकलतो. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने तपासाला महत्त्वाचा पुरावा मिळाला आहे.