30.1 C
Gondiā
Sunday, July 12, 2026
Home गुन्हेवार्ता कामठा चौकात ३.२० किलो गांजा पकडला

कामठा चौकात ३.२० किलो गांजा पकडला

0
7

गोंदिया : दुचाकीने गांजाची तस्करी करीत असलेल्या तरुणास पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून, त्याच्याकडील ३.२० किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. आमगाव पोलिस ठाण्यांतर्गत शहरातील कामठा चौकात नाकाबंदीदरम्यान शुक्रवारी (दि. १०) रात्री ८ ते ९:१५ वाजतादरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी गांजा व दुचाकी असा एकूण दोन लाख ५३ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. बाजार बंदोबस्त व नाकाबंदी दरम्यान आमगाव पोलिसांनी मोठी कारवाई करीत ३ किलो २० ग्रॅम गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या युवकाला रंगेहाथ पकडले. या कारवाईत गांजा, दुचाकी व मोबाइल असा एकूण २ लाख ५३ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
शहरातील कामठा चौकात सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र गुरतुळे यांच्या पथकाकडून शुक्रवारी रात्री नाकाबंदी सुरू होती. त्यावेळी कामठा चौकाच्या दिशेने विनाक्रमांकाची दुचाकी येताना दिसली. संशय आल्याने पोलिसांनी दुचाकी थांबवून चालकाची चौकशी केली असता चालकाने नीलेश हिरालाल मेश्राम (३४, रा. प्रधानटोला, सडक अर्जुनी) असे नाव सांगितले. पोलिसांनी त्याच्या पाठीवरील काळ्या-निळ्या रंगाची बॅग तपासली असता प्लास्टिक टेपने गुंडाळलेले दोन पुडके होते. त्यात हिरवी ओलसर पाने, फुले व बियामिश्रित ३.२० किलो गांजा होता. या कारवाईत पोलिसांनी एक लाख ५१ हजार रुपयांचा गांजा, एक लाख रुपये किमतीची दुचाकी तसेच दोन हजार रुपये किमतीचा मोबाइल असा एकूण दोन लाख ५३ हजार रुपयांचा माल जप्त केला.