28.1 C
Gondiā
Wednesday, July 15, 2026
Home विदर्भ गोंदियातील कॅरीयर झोन कोचिंग क्लासवर जीएसटी विभागाची धाड

गोंदियातील कॅरीयर झोन कोचिंग क्लासवर जीएसटी विभागाची धाड

0
28

गोंदिया : गोंदिया शहरातील मामा चौक परिसरातील कॅरीयर झोन नामकत कोचिंग क्लासवर नागपूर येथील आयकर व जीएसटी विभागाने आज ता. 15 जुलै रोजी धाड घातल्याने शहरात खळबळ उडाली.त्यातच जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईदरम्यान कागदपत्रांची तपासणी सुरू करीत कोचिंग क्लासमधील सर्व विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले.

जीएसटी (GST) नियमांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारींनंतर कोचिंग संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे. या उल्लंघनांमध्ये प्रामुख्याने कोचिंग शुल्कावर १८% जीएसटी न भरणे, ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ (ITC) मध्ये फेरफार करणे आणि रोख स्वरूपातील उत्पन्न लपवणे या बाबींचा समावेश आहे.शालेय शिक्षण किंवा पदवी मिळवून देणारे उच्च शिक्षण यांसारख्या औपचारिक शिक्षणाला जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे; मात्र, व्यावसायिक श्रेणीत येणाऱ्या सेवांवर—जसे की खाजगी शिकवणी (परीक्षेच्या तयारीसाठीच्या सेवा), व्यावसायिक प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षांचे कोचिंग आणि ई-लर्निंग (ऑनलाइन कोर्सेस व डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्म्स)—१८% कर लागू होतो. जेईई (JEE) आणि नीट (NEET) यांसारख्या व्यावसायिक आणि स्पर्धा परीक्षांसाठीचे कोचिंग याच १८% जीएसटीच्या कक्षेत येते.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कोचिंग क्लास मागील सहा ते सात वर्षांपासून मामा चौक परिसरात कार्यरत आहे. हा क्लास बिहार राज्यातील एका तरुणाने सुरू केला असून, यापूर्वीही अवैध बॅनर आणि जाहिरातींच्या मुद्यावरून तो चर्चेत आला होता.

आज जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी करासंदर्भातील कागदपत्रे, आर्थिक व्यवहार, बिलांची नोंद तसेच जीएसटीशी संबंधित दस्तऐवजांची पडताळणी सुरू केली. प्राथमिक माहितीनुसार, जीएसटी भरण्यात झालेल्या कथित अनियमिततेच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.मात्र, जीएसटी विभागाकडून या कारवाईबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे तपास पूर्ण झाल्यानंतरच कारवाईचे नेमके कारण आणि पुढील कार्यवाही स्पष्ट होणार आहे.