23.6 C
Gondiā
Friday, September 4, 2026
Home विदर्भ ‘बेरार टाईम्स’च्या वृत्ताचा धसका! आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडून जयस्तंभ चौक बसस्थानकाच्या भूमीपूजनाचा...

‘बेरार टाईम्स’च्या वृत्ताचा धसका! आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडून जयस्तंभ चौक बसस्थानकाच्या भूमीपूजनाचा मुहूर्त जाहीर

0
108

वर्षभराच्या दुर्लक्षानंतर अखेर ५ सप्टेंबरला होणार भूमीपूजन समारंभ; ‘बेरार टाईम्स’च्या दणक्यानंतर लोकप्रतिनिधींना जाग

गोंदिया :गोंदिया शहरातील मध्यवर्ती व अत्यंत महत्त्वाच्या जयस्तंभ चौक बसस्थानकाच्या सुशोभीकरणासाठी १ कोटी ७० लाख रुपयांच्या निधीची घोषणा करूनही गेल्या वर्षभरापासून प्रत्यक्ष कामाची एक वीटही रचली गेली नव्हती. या जुमलेबाजीवर व दुरावस्थेवर ‘बेरार टाईम्स’ने नुकतेच “१.७० कोटींच्या घोषणांचा फुगा फुटला! जयस्तंभ चौक बसस्थानक आजही दुरावस्थेच्या गर्तेत” या मथळ्याखाली सडेतोड वृत्त प्रकाशित करून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले होते.

‘बेरार टाईम्स’च्या या वृत्ताने प्रशासकीय व राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आणि शेवटी याची थेट दखल गोंदिया विधानसभेचे आमदार विनोद अग्रवाल यांना घ्यावी लागली आहे. जनतेचा वाढता संताप आणि वृत्तपत्रातील पोलखोलनंतर आता आमदार विनोद अग्रवाल यांनी घाईघाईने जयस्तंभ चौक बस स्टॉपच्या नूतनीकरण व सुशोभीकरणाच्या भूमीपूजनाचा मुहूर्त जाहीर करत निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध केली आहे.

शनिवारी ५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता भूमीपूजन

प्रसिद्ध करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेनुसार, शनिवार ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता जयस्तंभ चौक, गोंदिया येथे या बसस्टॉपचा भूमीपूजन समारंभ पार पडणार आहे.शुभहस्ते: राज्यसभा सदस्य राजेंद जैन आणि गोंदिया विधानसभेचे आमदार विनोद अग्रवाल होणार आहे.प्रमुख अतिथी म्हणून न.पा. गोंदियाचे नगराध्यक्ष सचिन शेंडे, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, मुख्य अधिकारी संदिप बोरकर,न.पा. उपाध्यक्ष संतोष पटले यांच्यासह नगरपरिषदेचे विविध गट नेते, सभापती व समस्त नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.

‘बेरार टाईम्स’च्या बातमीने जागा झाला प्रशासन!

जयस्तंभ चौकातील बसस्थानकावरून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी आणि महिला प्रवास करतात. मात्र पावसाळ्यात चिखल, खड्डे आणि दुर्गंधीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. केवळ सोशल मीडियावर आकर्षक पोस्टर्स आणि मॉडेल डिझाईन्स दाखवून स्वतःची पाठ थोपवून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या ढिसाळ कारभारावर ‘बेरार टाईम्स’ने प्रश्न उपस्थित केले होते.वृत्त प्रकाशित होताच नागरिकांमधूनही “आम्हाला कागदी नकाशे नको, प्रत्यक्ष काम दाखवा!” असा संतप्त सूर उमटला होता. जनतेचा हाच रोष ओळखून आमदारांनी तातडीने भूमीपूजनाचा कार्यक्रम आखला आहे.

आता तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार का?

भूमीपूजनाची घोषणा आणि पत्रिका तर निघाली, परंतु आता भूमीपूजनानंतर प्रत्यक्ष बांधकामाला आणि अत्याधुनिक सुशोभीकरणाला गती मिळणार की हेदेखील केवळ निवडणुकांच्या तोंडावर केलेले आणखी एक आश्वासन ठरणार, याकडे संपूर्ण गोंदिया शहराचे आणि जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.