**एटापल्ली येथे पहिल्या समुदायाधारित पाळणाघराचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते उद्घाटन
*बुर्गीतील डीएमएफची कामे, तोडसा आश्रमशाळा व आरोग्य केंद्राची पाहणी; नागुलवाही रस्त्याची गुणवत्ता तपासली
गडचिरोली, दि. ४ सप्टेंबर : जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य, सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात ४५ समुदायाधारित पाळणाघरे सुरू करण्यात येणार आहेत. या उपक्रमातील पहिल्या समुदायाधारित पाळणाघराचे उद्घाटन आज एटापल्ली तालुक्यातील पैमा येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते झाले. याच क्षेत्रीय दौऱ्यात त्यांनी बुर्गी येथील जिल्हा परिषद शाळेत जिल्हा खनिज प्रतिष्ठान (डीएमएफ) निधीतून सुरू असलेल्या कामांची, तोडसा येथील शासकीय आश्रमशाळेच्या नवीन इमारत बांधकामाची व प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. तसेच नागुलवाही येथील रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून कामाची गुणवत्ता तपासली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एटापल्ली अमर राऊत, उपविभागीय अधिकारी भामरागड शुभम पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी अजय डोके, टाटा ट्रस्ट्सच्या जयीता चौधरी, निलेश यादव, तहसीलदार हेमंत गांगुर्डे तसेच महिला व बालविकास, महसूल, आरोग्य आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासन, महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट्स यांच्यातील सामंजस्य करारांतर्गत ‘बाल पोषण व विकास उपक्रम’ राबविण्यात येत आहे. टाटा ट्रस्ट्सच्या सहकार्याने ‘मोबाईल क्रेचेस फॉर वर्किंग मदर्स चिल्ड्रेन’ संस्थेमार्फत एटापल्ली तालुक्यात या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
पोषण माहाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत बालकांना सुरक्षित वातावरणासह पोषक व वैविध्यपूर्ण आहार, आरोग्य व स्वच्छतेविषयक काळजी आणि वयानुरूप प्रारंभिक विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बालसंगोपनाची विश्वासार्ह सुविधा गावाजवळ उपलब्ध झाल्याने मातांना रोजगार, उपजीविका व अन्य जबाबदाऱ्यांसाठी आवश्यक वेळ देता येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाजाचे प्रमाण मोठे असून, एटापल्ली तालुक्यात १९७ हून अधिक गावे आहेत. यातील अनेक गावे दुर्गम व वनबहुल भागात असल्याने अत्यावश्यक सेवा कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यात भौगोलिक अडचणी येतात.





