23.9 C
Gondiā
Friday, July 17, 2026
Home शैक्षणिक नवीन अभ्यासक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आमगावात शिक्षकांचे चार दिवसीय प्रशिक्षण

नवीन अभ्यासक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आमगावात शिक्षकांचे चार दिवसीय प्रशिक्षण

0
7

आमगाव | प्रतिनिधी-राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) व राज्य शासनाच्या नवीन शालेय अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने इयत्ता तिसरी व चौथीच्या शिक्षकांसाठी चार दिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम आमगाव येथे उत्साहात पार पडला. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गटशिक्षणाधिकारी कार्यालय, आमगाव यांच्या समन्वयातून एल. एम. अध्यापक विद्यालयाच्या सभागृहात हे प्रशिक्षण शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी आयोजित करण्यात आले.
नवीन अभ्यासक्रमाची उद्दिष्टे, अध्यापन पद्धती, अध्ययन निष्पत्ती, मूल्यमापन प्रक्रिया, कृतीआधारित शिक्षण, विद्यार्थीकेंद्रित अध्यापन तसेच अध्यापनातील नावीन्यपूर्ण उपक्रमांची सखोल माहिती शिक्षकांना या प्रशिक्षणातून देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, चिकित्सक विचार, संवादकौशल्य आणि अनुभवाधारित शिक्षण विकसित करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणात आमगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा तसेच खाजगी शाळांमधील मोठ्या संख्येने शिक्षकांनी सहभाग नोंदविला. प्रशिक्षणादरम्यान गटचर्चा, प्रात्यक्षिके, अध्यापन नियोजन, कृती सादरीकरण आणि शंका-समाधान अशा विविध उपक्रमांमुळे शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाचे स्वरूप अधिक प्रभावीपणे समजून घेण्याची संधी मिळाली.
प्रशिक्षणाचे मार्गदर्शक म्हणून शेखर ब्राह्मणकर, कुमुदिनी घोडेस्वार, मंगला डिवरे आणि सचिन राऊत यांनी विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी नवीन अभ्यासक्रमाची संकल्पना, अध्यापनातील बदल, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक अध्यापन कौशल्ये आणि प्रभावी मूल्यमापन पद्धती याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणादरम्यान गटशिक्षणाधिकारी सुखचंद वाघमारे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजकुमार हिवारे, जिल्हा समन्वयक कुलदीपिका बोरकर तसेच अधिव्याख्याता वैद्य यांनी प्रशिक्षण वर्गाला भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधला. नवीन अभ्यासक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पायाभरणी करण्यासाठी प्रशिक्षणातील ज्ञान प्रत्यक्ष अध्यापनात प्रभावीपणे वापरण्याचे आवाहन त्यांनी केले.
संपूर्ण प्रशिक्षणाचे नियोजन व व्यवस्थापन गट साधन केंद्र, आमगावच्या वतीने करण्यात आले. प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वी आयोजनासाठी खुमेश कटरे आणि सुनील बोपचे यांनी विशेष सहकार्य केले.
चार दिवस चाललेल्या या प्रशिक्षणामुळे शिक्षकांचा नवीन अभ्यासक्रमावरील आत्मविश्वास वाढला असून आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार, आनंददायी आणि कौशल्याधारित शिक्षण देण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असल्याची भावना सहभागी शिक्षकांनी व्यक्त केली.