23 C
Gondiā
Thursday, September 3, 2026
Home शैक्षणिक पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत सितेपार गावाचा डंका

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत सितेपार गावाचा डंका

0
45

गोंदिया, गडचिरोली जिल्हा परिषदेत पाच उमेदवारांची शिक्षकपदी निवड

गोंदिया,3 सप्टेंबर-मेहनत, जिद्द आणि शिक्षणाच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणही मोठी शासकीय जबाबदारी पेलू शकतात, याचा प्रेरणादायी प्रत्यय आमगाव तालुक्यातील सितेपार गावातील पाच उमेदवारांनी दिला आहे. पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत सितेपार येथील पाच उमेदवारांची जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाली असून, त्यांच्या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झालेल्या शिक्षक भरतीत प्रमोद रमेश बिसेन, माया देवेंद्र चौधरी आणि गौरव राजकुमार मेश्राम यांची जिल्हा परिषद, गोंदिया येथे, तर पुष्पा रविंद्र चौधरी आणि संजय सुरज कावळे यांची जिल्हा परिषद, गडचिरोली येथे प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाली आहे.
ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत स्पर्धात्मक प्रक्रियेत यश मिळविणाऱ्या या पाचही उमेदवारांनी आपल्या कर्तृत्वाने सितेपारच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या यशामागे सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम, कुटुंबीयांचे पाठबळ आणि शिक्षक होण्याची जिद्द असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.शिक्षक हा केवळ नोकरी करणारा कर्मचारी नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा शिल्पकार असतो. त्यामुळे या पाचही नवोदित शिक्षकांच्या निवडीकडे केवळ रोजगाराच्या संधीच्या रूपाने नव्हे, तर ग्रामीण भागातील भावी पिढी घडविण्याची मोठी जबाबदारी म्हणून पाहिले जात आहे.
विशेष म्हणजे, एकाच गावातील पाच उमेदवारांनी एकाच शिक्षक भरती प्रक्रियेत यश मिळविल्याने सितेपार गावातील युवक, युवती व विद्यार्थ्यांसाठीही हे यश प्रेरणादायी ठरणार आहे.पाच उमेदवारांची शिक्षकपदी निवड झाल्याने सितेपार गावात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या यशाबद्दल ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.