25.8 C
Gondiā
Saturday, July 18, 2026
Home विदर्भ चिचगड-ककोडी रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळली दुर्मीळ ‘उडणारी खार’; वनविभागाकडून तत्पर उपचार

चिचगड-ककोडी रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळली दुर्मीळ ‘उडणारी खार’; वनविभागाकडून तत्पर उपचार

0
30

देवरी ,दि. १८ जुलै: तालुक्यातील चिचगड-ककोडी रस्त्याच्या बाजूला अत्यंत दुर्मीळ मानली जाणारी ‘उडणारी खार’ जखमी अवस्थेत आढळल्याची घटना गुरुवारी (दि. १६) समोर आली आहे. वन्यजीवप्रेमी आणि सजग नागरिकांच्या तत्परतेमुळे या जीवाचे प्राण वाचवण्यात यश आले असून, वनविभागाने तिला तातडीने ताब्यात घेऊन उपचार सुरू केले आहेत.

अशी घडली घटना: गुरुवारी चिचगड-ककोडी मार्गावरून जात असताना प्रा. महेश रहांगडाले यांना रस्त्याच्या कडेला एक खार जखमी अवस्थेत पडलेली दिसली. तिची पाहणी केली असता, ती सर्वसामान्य खार नसून निसर्गाचा अनमोल ठेवा असलेली ‘उडणारी खार’ (Flying Squirrel) असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी वेळ न घालवता यासंदर्भातील माहिती वनरक्षक लोकेश टेंभरे व सुरेश रहांगडाले यांना दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठून जखमी खारीला आपल्या ताब्यात घेतले आणि प्रथमोपचार सुरू केले. या संदर्भात माहिती देताना चिचगडचे वन परिक्षेत्र अधिकारी पी. बी. वाडे यांनी सांगितले की, “जखमी उडणाऱ्या खारीवर सध्या वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यानंतर आणि ती पुन्हा निसर्गात वावरण्यास सक्षम झाल्यावर तिला सुरक्षितपणे तिच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच जंगलात मुक्त केले जाईल.”वनविभागाच्या या तत्परतेबद्दल आणि प्रा. रहांगडाले यांच्या सजगतेबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.

कायद्याचे कवच: तस्करी आणि शिकार केल्यास कठोर कारवाई! वन्यजीव संरक्षण कायदा २०२२ च्या नवीन दुरुस्तीनुसार, भारतात आढळणाऱ्या सर्व विशाल खारी (Giant Squirrels) आणि उडणाऱ्या खारी (Flying Squirrels) यांचा समावेश आता अत्यंत ‘दुर्मीळ प्रजातीं’मध्ये करण्यात आला आहे. या प्राण्यांना कायद्याने सर्वोच्च संरक्षण प्राप्त आहे. त्यामुळे अशा प्राण्यांची शिकार करणे, त्यांना घरात पाळणे, इजा पोहोचविणे किंवा त्यांची तस्करी करणे हा बिगरजामीनपात्र आणि अत्यंत गंभीर गुन्हा मानला जातो.