24.8 C
Gondiā
Tuesday, July 21, 2026
Home विदर्भ विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे मैदानात!

विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे मैदानात!

0
36
जंतर-मंतर येथील आंदोलनाला भेट देऊन जाहीर पाठिंबा; केंद्र सरकारने सकारात्मक चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन

कामठी (विशेष प्रतिनिधी) :राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी कॉक्रोज जनता पार्टीच्या वतीने सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला आता मोठे राजकीय आणि सामाजिक पाठबळ लाभले आहे. कामठीच्या लोकप्रिय नेत्या तथा माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी दिल्ली गाठून थेट जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळाला भेट दिली आणि आपला सक्रिय व जाहीर पाठिंबा व्यक्त केला. याप्रसंगी त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या आणि त्यांच्या संघर्षाला बळ दिले.

त्यांनी पुढे बोलताना केंद्र सरकारला कडक शब्दांत आवाहन केले की, सरकारने कोणत्याही प्रकारचा ताठरपणा न दाखवता आंदोलक विद्यार्थ्यांशी तातडीने सकारात्मक चर्चा करावी. संविधानाचा सन्मान ठेवून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सन्मानजनक तोडगा काढणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी आंदोलनाचे प्रमुख कार्यकर्ते, कॉक्रोज जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. सुलेखाताई कुंभारे यांच्या या थेट पाठिंब्यामुळे आता या आंदोलनाला अधिक धार आली असून, केंद्र सरकार यावर काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

जंतर-मंतरवर निदर्शने; ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या उपस्थितीमुळे आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाला. जंतर-मंतर येथील वातावरण सध्या विद्यार्थ्यांच्या बुलंद आवाजाने दुमदुमून गेले आहे.

  • हातात ‘भारताचे संविधान’ पुस्तक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र असलेला निळा ध्वज घेऊन विद्यार्थी आंदोलनात ठामपणे उभे आहेत.

  • ‘जय भीम – जय भारत’ च्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेतले.

“संविधानाच्या चौकटीत सुरू असलेला लढा यशस्वी होईल”
आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे म्हणाल्या की:”देशातील विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित राहणे हेच राष्ट्राच्या प्रगतीचे खरे लक्षण आहे. विद्यार्थी हे या देशाचे भविष्य आहेत. संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून अत्यंत शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांची दखल केंद्र सरकारने त्वरित घेतली पाहिजे.”

blank