28 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रपतींच्या नावे निवेदन

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रपतींच्या नावे निवेदन

0
7

▪️शिक्षण बचाव समन्वय समितीतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत सादर

गोंदिया, दि. २४ जुलै : दिल्ली येथे शिक्षण व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ शिक्षण बचाव समन्वय समिती, जिल्हा गोंदिया यांच्या वतीने भारताच्या महामहिम राष्ट्रपती महोदया यांच्या नावे उपविभागीय अधिकारी, गोंदिया यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले. निवेदन नायब तहसीलदार नितील चौरे यांनी स्विकारले.

निवेदनात शांततापूर्ण आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईची निष्पक्ष व स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, चौकशीत अतिरेकी बलप्रयोग झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच शिक्षण व विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या प्रतिनिधींशी केंद्र शासनाने तात्काळ संवाद साधून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की, भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा व आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रदान करते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांवर बलप्रयोग करण्याऐवजी संवाद आणि संवेदनशीलतेच्या माध्यमातून प्रश्न सोडविणे ही लोकशाहीची खरी भावना आहे.
तसेच आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांसाठी अन्न, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, बस-रेल्वे प्रवास तसेच इतर आवश्यक मदत व सुविधा सुरळीत उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.

यावेळी समन्वयक अतुल सतदेवे यांच्यासह वसंत गवळी, सी. पी. बिसेन, मनोज मेंढे, आदेश कुमार, मनोहर भावे, ए. डी. बोरकर, सुनील भोंगाडे, कैलाश भेलावे, दिलीप ब्राह्मणकर, जे. पी. गजभिये, रवी भांडारकर, रोहित सतदेवे आदींसह अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण, शिक्षणाशी संबंधित प्रश्नांवर तातडीने संवाद सुरू करणे आणि शांततापूर्ण आंदोलनांचा सन्मान राखणे, अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली.

blank