28.5 C
Gondiā
Friday, September 11, 2026
Home विदर्भ दुष्काळाचा दांडिया अन् बोनसचा हुंकार! पोळ्याच्या मैदानात ‘राजा’ सजला मागण्यांच्या फलकांनी; अमरावती-गोंदियात...

दुष्काळाचा दांडिया अन् बोनसचा हुंकार! पोळ्याच्या मैदानात ‘राजा’ सजला मागण्यांच्या फलकांनी; अमरावती-गोंदियात सरकारविरोधात एल्गार

0
5

अमरावती/गोंदिया: सण पोळ्याचा, उत्साह आनंदाचा… पण सर्जा-राजाच्या पाठीवर यंदा झुल नव्हती, तर होती अस्मानी अन सुलतानी संकटाची जाणीव! दोन-दोन महिने पावसाने मारलेली दडी, करपून कोळसा झालेली सोयाबीन अन् धान पिकाची झालेली चाळण; या साऱ्या भीषण वास्तवाची दाहकता यंदाच्या पोळ्यात थेट पाहायला मिळाली. अमरावतीच्या शिरजगाव मोझरीत सोयाबीन उत्पादकांनी बैलांवर ‘कोरडा दुष्काळ जाहीर करा’ लिहून हंबरडा फोडला, तर गोंदियाच्या पांजरा गावात ‘सरकारने शब्द पाळावा, धानाचा बोनस द्यावा’चे बॅनर लावून शेतकऱ्यांनी थेट प्रशासनाच्या नाकावर टिच्चून आंदोलन छेडले.

सोयाबीन करपले, बैलजोड्या विकायची वेळ! तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथील चित्र काळजाचा ठोका चुकवणारे होते. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. हातातोंडाशी आलेला सोयाबीनचा घास निसर्गाने हिरावून घेतला. वाढती महागाई अन् शेतीचा खत-बियाण्यांचा अफाट खर्च पेलताना शेतकरी इतका कोलमडला आहे की, अनेक बळीराजांवर ऐन सणात पोटच्या पोरासारख्या जपलेल्या बैलजोड्या विकण्याची वेळ आली. या परिस्थितीचा निषेध म्हणून पोळ्याच्या दिवशी पारंपरिक सजावटीला फाटा देत, बैलांच्या अंगावरच कोरड्या दुष्काळाच्या मागण्या कोरून शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली.blank

‘धानाचा बोनस द्या, शब्द पाळा!’ – गोंदियात अनोखा पोळा तिकडे गोंदिया जिल्ह्यातील पांजरा गावातही चित्र वेगळे नव्हते. वर्षभरापासून धानाच्या बोनसच्या गप्पा मारणाऱ्या सरकारचा बुरखा शेतकऱ्यांनी टराटरा फाडला. नवीन कपडे अन् सजावटीचे साहित्य खरेदी करायला खिशात फुटकी कवडीही उरली नसल्याने, पांजरा येथील शेतकऱ्यांनी थेट ‘सरकारने दिलेला शब्द पाळा, धानाचा बोनस द्या’ असा स्पष्ट संदेश देणारे बॅनरच बैलांच्या अंगावर बांधले.

  • गेल्या वर्षभरापासून दिलेल्या आश्वासनांचे काय झाले?

  • वाढत्या महागाईत शेतकरी कसा जगणार?

  • केवळ कागदावरच्या घोषणा नकोत, बोनस खात्यात कधी जमा होणार?

पोळा हा कृतज्ञतेचा सण. पण यंदा अमरावती अन् गोंदियाच्या शेतकऱ्यांनी याच पोळ्याला आंदोलनाचे रूप देत सरकारला उघडे पाडले आहे. आता तरी वातानुकूलित केबिनमध्ये बसणारे सरकार या बळीराजाच्या आक्रोशाची दखल घेऊन कोरडा दुष्काळ आणि धानाचा बोनस तातडीने जाहीर करणार का? की शेतकरी असाच वाऱ्यावर सोडला जाणार, याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.