24.8 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त कालीमातीत ५६ वृक्षांचे रोपण; ‘झाडे जगविण्याचा’...

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त कालीमातीत ५६ वृक्षांचे रोपण; ‘झाडे जगविण्याचा’ सामूहिक संकल्प

0
9

गोंदिया:राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोरेगाव तालुक्यातील कालीमाती येथे पर्यावरण संवर्धनाचा एक स्तुत्य व प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री तथा माजी सभापती मनोज बोपचे यांच्या पुढाकारातून गावात ५६ विविध प्रजातींच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. केवळ वृक्षारोपण करून न थांबता, “लावलेली ५६ झाडे पूर्ण ताकदीने जगविणारच,” असा सामूहिक संकल्प ग्रामस्थांनी यावेळी सोहळ्यात केला.

वाढते प्रदूषण, झपाट्याने कमी होत चाललेले वनक्षेत्र आणि हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर, “मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छांचा वर्षाव न करता समाजासाठी उपयुक्त असे विधायक कार्य करणे हीच त्यांना खरी शुभेच्छा ठरेल,” असे प्रतिपादन मनोज बोपचे यांनी केले. “झाड लावणे ही केवळ सुरुवात असून, ते वृक्ष होईपर्यंत जगविणे हीच खरी समाजसेवा आहे,” असे आवाहनही त्यांनी ग्रामस्थांना केले.
पर्यावरण जनजागृतीची प्रभावी चळवळ
या उपक्रमांतर्गत रोपलेल्या प्रत्येक रोपाची नियमित देखभाल, पाणी आणि संरक्षणाची जबाबदारी उपस्थित कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी स्वखुशीने स्वीकारली. त्यामुळे हा सोहळा केवळ औपचारिक न राहता पर्यावरण संरक्षणाची एक प्रभावी चळवळ ठरला.
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
या सोहळ्याला कालीमाती ग्रामपंचायतीचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष राधेलाल पटले, नानीकराम रहांगडाले, जगतराम पटले, जायचंद पटले, केवलजी पटले, मोहन पटले, रोजगार सेवक जियालाल पटले, उपसरपंच सुभाष रहांगडाले यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी प्रत्यक्ष वृक्षारोपणात हातभार लावून सामाजिक बांधिलकी जपली. मनोज बोपचे यांच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
“आज लावलेली ही ५६ झाडे उद्याच्या भावी पिढीसाठी हिरवागार आणि समृद्ध वारसा ठरतील.”— मनोज बोपचे, माजी सभापती व युवा भाजप महामंत्री

blank