गोंदिया,दि.२८:सकल ओबीसी महामोर्चा व समविचारी सर्व ओबीसी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ३ ऑगस्ट रोजी भंडारा येथून निघणाऱ्या ऐतिहासिक ‘मंडल यात्रे’च्या गोंदिया जिल्ह्यातील आगमनानिमित्त रविवारी (२६ जुलै) शासकीय विश्रामगृह येथे तातडीची नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत ७ ऑगस्ट रोजी यात्रेचे जिल्ह्यात भव्य स्वागत करण्यासह ठिकठिकाणी कॉर्नर सभांचे आयोजन करण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सकल ओबीसी महामोर्चाचे संयोजक उमेश कोराम होते.
३ ऑगस्टला भंडारा येथून सुरू होणारी ही मंडल यात्रा ७ ऑगस्ट रोजी गोंदिया जिल्ह्यात प्रवेश करेल. या यात्रेच्या माध्यमातून ओबीसींच्या हक्क आणि प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यात येणार आहे.ओबीसींच्या हक्क आणि मागण्यांसाठी आयोजित या बैठकीला विविध ओबीसी बहुजन संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे, ओबीसी महासभेचे अध्यक्ष इंजि. राजीव ठकरेले, ओबीसी अधिकार मंचचे संयोजक खेमेंद्र कटरे, ओबीसी सेवा संघाचे भूमेश शेंडे, शिक्षण बचाव समितीचे सी. पी. बिसेन, वसंत गवळी, डॉ. भूमेश ठाकरे (गोरेगाव), शिव नागपूरे (राणी अवंतीबाई लोधी संघटना), रमेश लांजेवार (सडक अर्जुनी), प्रेमलाल साठवणे (भारतीय शोषित पीडित संघटना), सुनील भोंगाडे (युवा बहुजन मंच), रवी भांडारकर, गौरव बिसेन (ओबीसी विद्यार्थी संघटना), निखिल बनसोड, बाळू वंजारी, विनीत गजभिये, आकाश वैद्य, सुधाकर मोठालकर, अमित घरवाले, कमल हटवार, संतोष खोब्रागडे आणि एस. यू. वंजारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. गोंदिया जिल्ह्यातील स्वागतासाठी व विविध कार्यक्रमांसाठी खालीलप्रमाणे रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे.
सकाळी (तिरोडा): तिरोडा तालुक्यातील नवेगाव येथे यात्रेचे धुमधडाक्यात आगमन व स्वागत.
सकाळी १०.०० वा.: तिरोडा मार्गे एकोडी येथे पहिली कॉर्नर सभा.
सकाळी ११.०० वा.: गोंदिया शहरात आगमन व महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन.
सकाळी ११.३० वा.: गोरेगाव ठाणा चौक येथे कॉर्नर सभा.
दुपारी १२.०० वा.: आमगाव तालुक्यातील ठाणा येथे जंगी स्वागत.
दुपारी १२.३० वा.: आमगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कॉर्नर सभा.
दुपारी १.०० ते २.०० वा.: साखरीटोला (१.०० वा.), डोंगरगाव सावली (१.३० वा.) आणि देवरी (२.०० वा.) येथे भव्य स्वागत.
दुपारी २.३० वा.: कोहमारा / सडक अर्जुनी येथे कॉर्नर सभा.
या सर्व कार्यक्रमानंतर ही मंडल यात्रा अर्जुनी मोरगाव मार्गे लाखांदूरकडे (जि. भंडारा) रवाना होईल, असे नियोजन बैठकीत ठरवण्यात आले.





