27.5 C
Gondiā
Tuesday, July 28, 2026
Home विदर्भ खैरबंदा टेलवरील १२ गावांना दिलासा: ₹३०० कोटींच्या ‘करटी लिफ्ट इरिगेशन’ योजनेला मंजुरी

खैरबंदा टेलवरील १२ गावांना दिलासा: ₹३०० कोटींच्या ‘करटी लिफ्ट इरिगेशन’ योजनेला मंजुरी

0
2

डॉ. योगेंद्र भगत यांचा पाठपुरावा अन् आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नांना यश; हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येणार

चित्रा कापसे / तिरोडा:तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील खैरबंदा जलाशयाच्या सिंचन क्षेत्रातील टेलवरील (शेवटच्या भागातील) १२ गावांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सिंचनाचा प्रश्न अखेर सुटला आहे. आमदार विजय रहांगडाले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि राष्ट्रवादी किसान आघाडीचे गोंदिया जिल्हाध्यक्ष डॉ. योगेंद्र भगत यांच्या पुढाकारामुळे ‘करटी लिफ्ट इरिगेशन’ या कायमस्वरूपी सिंचन योजनेला शासनाकडून ₹३०० कोटींच्या निधीची मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काय होती समस्या?
एल.बी.सी. कालव्याच्या टेलवरील गावांना रब्बी हंगामात अजिबात पाणी मिळत नव्हते, तर खरीप हंगामातही अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे दरवर्षी पिकांचे अतोनात नुकसान होत होते. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन डॉ. योगेंद्र भगत यांनी आमदार विजय रहांगडाले यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. तसेच समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून धापेवाडा उपसा सिंचन योजनेद्वारे करटी (बु.) येथील कालव्याच्या टेलपर्यंत पाणी पोहोचविण्याचा तांत्रिक प्रस्ताव मांडला होता.

या १२ गावांना होणार थेट फायदा
३०० कोटींच्या या योजनेमुळे परिसरातील खालील १२ गावांना वर्षभर सिंचनाची सुविधा मिळणार आहे:लाभार्थी गावे: करटी, बोरा, इंदोरा, बिहिरिया, बाघोली, परसवाडा, चांदोरी, खैरलांजी, अर्जुनी, सावरा, पिपरिया आणि डब्बे टोला.

लोकप्रतिनिधींचे मानले आभार
या ऐतिहासिक निर्णयामुळे वर्षानुवर्षे सिंचनापासून वंचित असलेल्या गावांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. डॉ. योगेंद्र भगत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आमदार विजय रहांगडाले यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. यावेळी करटीचे सरपंच महेश पटले, चांदोरीचे माजी सरपंच अल्केश मिश्रा, राष्ट्रवादी किसान आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर पारधी आणि मोरेश्वर ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.ही योजना पूर्णत्वास गेल्यानंतर परिसरातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून कृषी उत्पादनात मोठी वाढ होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

blank