25.7 C
Gondiā
Tuesday, July 28, 2026
Home विदर्भ कुडव्यात ‘लाइट’वरून राजकारण पेटले; हक्काचे पोल इतर वॉर्डांत लावल्याने सदस्याचा तडकाफडकी राजीनामा

कुडव्यात ‘लाइट’वरून राजकारण पेटले; हक्काचे पोल इतर वॉर्डांत लावल्याने सदस्याचा तडकाफडकी राजीनामा

0
69

गोंदिया : अहोरात्र मेहनत करून आणि पाठपुरावा करून स्वतःच्या वॉर्डासाठी मंजूर आणलेले पथदिवे (स्ट्रीट लाइट्स) आणि खांब इतर वॉर्डांत पळवले जात असल्याचा गंभीर आरोप करत गोंदिया तालुक्यातील कुडवा ग्रामपंचायतीचे सदस्य श्री नागे दिलीप देवीलाल यांनी आपल्या सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. सरपंच आणि सचिवांच्या या मनमानी कारभाराचा तीव्र निषेध नोंदवत त्यांनी हा निर्णय घेतला असून, या प्रकरणामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

अथक प्रयत्नांनंतर मिळाली होती मंजुरी कुडवा ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक १ मध्ये वाढत्या चोऱ्या आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी पथदिव्यांची अत्यंत गरज होती. यासाठी सदस्य नागे यांनी स्वतः पुढाकार घेत संपूर्ण वॉर्डाचा सर्व्हे करून नकाशा तयार केला होता. २० नोव्हेंबर २०२३ च्या ग्रामपंचायत सभेत ठराव मंजूर करून घेतल्यानंतर, ७ मे २०२४ रोजी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. सततच्या पाठपुराव्यानंतर जिल्हा परिषदेच्या मंजूर यादीत वॉर्ड क्र. १ साठी तब्बल २७५ खांब आणि ३६५ दिव्यांचा प्रस्ताव मंजूर झाला होता.

मंजूर नकाशा बाजूला सारून मनमानी मात्र, एवढी मेहनत करूनही ऐनवेळी मंजूर नकाशा डावलून वॉर्ड क्र. १ ऐवजी हे खांब आणि दिवे इतर वॉर्डांत बसवण्याचा सपाटा सरपंच आणि सचिवांनी सुरू केला आहे. इतकेच नव्हे तर, वॉर्ड क्र. १ अंतर्गत येणाऱ्या शिव मोक्षधामासाठी मंजुरी आणूनही तेथे इलेक्ट्रिक खांब न लावता, मंजुरी नसलेल्या भलत्याच ठिकाणी खांब लावून प्रशासकीय मनमानी केली जात असल्याचा आरोप नागे यांनी केला आहे.

जनतेला काय उत्तर द्यायचे? सदस्य आक्रमक “इतर कोणत्याही वॉर्ड सदस्याने असा प्रस्ताव दिला नव्हता. आम्ही पाठपुरावा करून निधी व मंजुरी आणली. मात्र, आता हक्काचे खांब दुसऱ्या वॉर्डांत लावले जात असल्याने मला माझ्या वॉर्डातील जनतेला तोंड देणे कठीण झाले आहे,” अशी उद्विग्न भावना नागे यांनी व्यक्त केली. सरपंच आणि सचिवांच्या या दुटप्पी धोरणाचा निषेध म्हणून त्यांनी राजीनामा अस्त्र उपसले असून, सरपंच राजीनामा स्वीकारण्यास टाळाटाळ करत असल्याने त्यांनी आता वरिष्ठ पातळीवर दाद मागण्याची तयारी दर्शवली आहे.

blank