*अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सवात’ मराठी कला-संस्कृतीचा जागर!*
*कॅलिफोर्निया, सॅन होजे (प्रतिनिधी) :* महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२६ ची सुरुवात हॉलिवूडच्या ग्लॅमरला साजेशा दिमाखदार रेड कार्पेट सोहळ्याने झाली. कॅमेऱ्यांच्या लखलखत्या फ्लॅशमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज तारे-तारकांच्या शानदार आगमनाने सॅन होजेतील वातावरण मराठमोळ्या उत्साहाने भारून गेले. या सोहळ्यात हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यरंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना त्यांच्या दैदिप्यमान कलाप्रवासाबद्दल मानाचा ‘नाफा जीवन गौरव’ प्रदान करण्यात आला. नाफाचे संस्थापक-अध्यक्ष अभिजित घोलप यांच्या हस्ते हा सन्मान बहाल करण्यात आला. यावेळी नाफाच्या को-कन्व्हेनर अर्चना सराफ, रिया ठोसर, ज्येष्ठ सभासद श्री. ठाणेदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
*भारताबाहेरील पहिला पुरस्कार*
रोहिणी हट्टंगडी यांनी हा सन्मान आपल्या संपूर्ण कलाप्रवासाला आकार देणाऱ्या आई-वडिलांसह गुरु इब्राहिम अल्काझी, पती जयदेव हट्टंगडी, सहकलाकार, दिग्दर्शक, लेखक, कलावंत आणि निर्माते यांना समर्पित केला. त्या म्हणाल्या, “मला अजून खूप काम करायचे आहे. ‘जीवन गौरव’ मिळाल्यानंतर घरी बसण्याचा माझा अजिबात विचार नाही. भारताबाहेर मिळालेला हा माझा पहिलाच पुरस्कार असल्याने हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत विशेष आणि भावनिक आहे.” नाफाने दिलेल्या सुंदर कार्यक्रमासाठी त्यांनी अभिजित घोलप आणि नाफाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.
*‘नाफा’ म्हणजे केवळ चित्रपट महोत्सव नव्हे, सांस्कृतिक जागर!*
अभिजित घोलप म्हणाले, “नाफा हा केवळ रुपेरी पडद्याशी जोडलेला चित्रपट महोत्सव नसून अमेरिकेच्या भूमीत मराठी भाषा, संस्कृती, कला आणि परंपरेचा जागर घडविणारे सांस्कृतिक व्यासपीठ आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यामुळे यंदापासून या उपक्रमाला अधिक बळ मिळाले आहे. मराठी भाषा-संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या या प्रवासात युवा पिढीही हिरिरीने सहभागी होत आहे. यापूर्वीचा नाफा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते दिलीप प्रभावळकर व अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांना देण्यात आला आहे. आज त्याच प्रभावळीतील रोहिणीताई हट्टंगडींचा सन्मान करण्याची संधी मिळणे हा नाफासाठी अभिमानाचा क्षण असून, त्यांच्या सहवासाने नाफाचे व्यासपीठ अधिक समृद्ध होत आहे.”
*रेड कार्पेटवर मराठी सेलिब्रिटींचा ‘स्वॅग’*
रेड कार्पेटवर यंदा मराठी कलाकारांचा ‘स्वॅग’ काही औरच पाहायला मिळाला. पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषेपासून आधुनिक भारतीय आणि वेस्टर्न फॅशनपर्यंत विविध शैलींचे अनोखे मिश्रण कलाकारांच्या पेहरावातून दिसून आले. प्रत्येक कलाकाराने आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा शैलीत रेड कार्पेटवर एन्ट्री घेत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
गिरीजा ओक, श्रुती मराठे, अर्चना जोगळेकर, सई देवधर, डॉ. गौरी घोलप यांच्या एलिगेंट आणि स्टायलिश ग्लॅमरस पेहरावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले; त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण अंदाजाने अमेरिकेतील मराठी रसिकांमध्येही त्यांची विशेष चर्चा रंगली. महेश कोठारे, अभिजित घोलप आणि अजिंक्य देव यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा आकर्षक पाश्चात्य वेशभूषेतून खास ‘स्टार अपील’ निर्माण केले.
ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, तृप्ती भोईर, निर्माती मंजिरी ओक, नीलिमा कोठारे, अर्चना सराफ, रिया ठोसर, मानसी देवळेकर यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा देखण्या आणि अभिजात अंदाजात उपस्थिती लावली, तर दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते अतुल कुलकर्णी, प्रसाद ओक यांच्या सहज, स्वाभाविक स्टाइलनेही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. निर्माती गार्गी कुलकर्णी यांच्या आकर्षक आणि सुसंस्कृत लुकनेही रेड कार्पेटची शोभा वाढवली. परंपरा, आधुनिकता, भारतीयत्व आणि ग्लोबल फॅशन यांचा सुरेख संगम घडवत मराठी कलाकारांनी आपल्या स्टाइलमधून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैविध्याची खास झलक हॉलिवूडनगरीत दाखवून दिली. कलाकारांच्या रेड कार्पेटवरील प्रत्येक एन्ट्रीला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. रसिकांमध्ये त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यांमध्ये कलाकारांच्या छबी टिपण्यासाठी अक्षरशः चढाओढ लागली होती.
*गाला डिनरला मराठी कलावंतांसह अमेरिकेतील प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती*
नाफाच्या प्रथेनुसार आदल्यादिवशी ‘नाफा’ संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप यांच्या घरी ‘गाला डिनर’चे आयोजन करण्यात आले होते. या ‘गाला डिनर’मध्ये मराठी कलावंतांसह अमेरिकेतील प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली. सॅन होजे येथील California Theatre मध्ये तीन दिवस रंगणाऱ्या ‘नाफा महोत्सवा’च्या पुढील दोन दिवसांत विविध चर्चासत्रे, मार्गदर्शनपर व मनोरंजक कार्यक्रमांसह अनेक चित्रपट आणि लघुपटांचे वर्ल्ड प्रीमिअर व विशेष स्क्रीनिंग होणार आहेत. हॉलिवूडच्या पंढरीत मराठी सिनेमाचा झेंडा आणि मराठी संस्कृतीचा जागर घडविणारा ‘नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२६’चा हा दिमाखदार सोहळा जागतिक मराठी समुदायासाठी निश्चितच अभिमानाचा ठरत आहे.





