गडचिरोली :: गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर जनसंवाद घडवून आणण्यासाठी सुरू असलेल्या ‘चरखे के पास चर्चा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना अशोक वानखेडे म्हणाले की, “स्वतःच्या हक्काची आणि अस्तित्वाची लढाई दुसरा कोणी येऊन लढणार नाही, ती लढाई आपल्यालाच लढावी लागेल. आपल्या प्रश्नांसाठी संघटित होऊन आवाज उठवणे आवश्यक आहे.”
महात्मा गांधींच्या विचारांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, अन्यायाविरोधातील लढाई अहिंसेच्या मार्गाने आणि लोकशाहीच्या माध्यमातून लढली पाहिजे. संविधानाने नागरिकांना दिलेले अधिकार केवळ मागून मिळतीलच असे नाही, तर त्या अधिकारांसाठी जागरूक राहून लोकशाही मार्गाने संघर्ष करावा लागेल.
गडचिरोली जिल्ह्यातील विकासाच्या प्रश्नांवर भाष्य करताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. “आज सरकार कोण चालवत आहे, हा प्रश्न सामान्य नागरिकांनी विचारण्याची वेळ आली आहे. अदानी-अंबानींसारख्या मोठ्या उद्योगसमूहांचा सरकारच्या धोरणांवर किती प्रभाव आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
“गडचिरोलीचा विकास कसा आणि कोणत्या दिशेने करायचा, याचा निर्णय गडचिरोलीतील जनतेने घ्यायला हवा. मात्र आज जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये कंपन्यांचा प्रभाव वाढताना दिसत आहे. स्थानिक नागरिक, शेतकरी आणि आदिवासींच्या हिताचा विचार सर्वप्रथम झाला पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
जिल्ह्याला दोन पालकमंत्री असतानाही मूलभूत प्रश्न कायम असल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला. केवळ पदे आणि घोषणा असून उपयोग नाही, तर गडचिरोलीतील नागरिकांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष निर्णय आणि ठोस कृती होणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
गडचिरोलीच्या सुपीक शेतजमिनी, नैसर्गिक साधनसंपत्ती, जंगल आणि स्थानिक नागरिकांचे हक्क यांचे संरक्षण करताना विकासाचा समतोल साधला पाहिजे. विकासाच्या नावाखाली स्थानिक नागरिकांचे अस्तित्व, उपजीविका आणि हक्क धोक्यात येता कामा नये, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा जिल्हा प्रभारी संदेश सिंगलकर, महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोर पाटील पोरेटी, आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव कुसुमताई आलाम, नगरसेवक तथा शहर अध्यक्ष सतीश विधाते, दिवाकर निसार, प्रमोद भगत, राजेश ठाकूर, शंकरराव सालोडकर, माधव गावड, राजेंद्र बुल्ले, अनिल कोठारे, रवींद्र पाल, विजय लाड, विलास चीचघरे, उत्तम ठाकरे, रोडे महाराज, ढिवरू मेश्राम, डॉ. शीतल ठवरे, विमल भोयर, भारत येरमे, सुशील शहा, विकास जेंगठे, राहुल वैरागडे, नदीम नाथानी, गौरव येनप्रेड्डीवार, देवानंद कुमरे, लीलाधर गुरनुले, कालिदास पेंदाम, गुरुदास ठाकरे, वनिता बाबनवाडे, रेखाताई जेंगठे, शालिना निसार, सोनी कांबळे, आशा पेंदाम सह मोठ्या संख्येने शेतकरी महिला युवक व जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
‘चरखे के पास चर्चा’च्या माध्यमातून गडचिरोलीतील विविध प्रश्नांवर खुलेपणाने चर्चा होत असून नागरिकांनीही आपल्या समस्या आणि भूमिका मांडण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.





