अर्जुनी-मोर.मागील महिनाभरापासून नवेगाव बांध व परिसरात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असून, विशेषतः दररोज सायंकाळपासून रात्रभर वीज ये-जा करत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येची तातडीने दखल घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी नवेगाव बांध येथील सुज्ञ नागरिकांनी आज महावितरणच्या नवेगाव बांध विद्युत वितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंत्यांना निवेदन दिले.
वारंवार वीज खंडित होणे तसेच कमी-जास्त दाबाने विद्युत पुरवठा होण्यामुळे घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दुकानदार, छोटे व्यावसायिक तसेच ऑनलाइन सेवा व विद्युत उपकरणांवर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावरही याचा मोठा परिणाम होत आहे. पावसाळ्यात रात्रीच्या वेळी वारंवार वीजपुरवठा खंडित होणे ही सुरक्षिततेच्या दृष्टीनेही गंभीर बाब असल्याचे नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे.
महावितरणने नवेगाव बांध येथील विद्युत वितरण व्यवस्थेची तातडीने तांत्रिक तपासणी करावी. विद्युत वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर, फिडर व इतर संबंधित यंत्रणेची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी आणि नागरिकांना नियमित, स्थिर व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.समस्या तातडीने सोडविण्यात आली नाही तर नागरिकांना आंदोलनात्मक मार्गाचा अवलंब करावा लागू शकतो, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
निवेदन देताना माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती विजयाताई कापगते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष लोकपालजी गहाणे,रामदास बोरकर, एकनाथ बोरकर,निखिल वैद्य,हरिश्चंद्र लाडे, कोमल डोंगरवार, वसंत उजवणे तसेच सुजल एनजीओचे सचिव कालिदास पुस्तोळे यांच्यासह नवेगाव बांध येथील नागरिक उपस्थित होते.नागरिकांच्या या मागणीची महावितरण प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.





