25.8 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ विकासकामांचा पालक सचिवांकडून आढावा;मुलींसाठी शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश

विकासकामांचा पालक सचिवांकडून आढावा;मुलींसाठी शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश

0
6

गोंदिया, दि.14 : शाळेतील मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी शासकीय तसेच अशासकीय शाळांमध्ये मुलींसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव रणजीत सिंह देओल यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत दिले. यासह जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (घरकुल योजना), जलजीवन मिशन, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM), जलयुक्त शिवार, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, वन विभागाची माहिती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना-2026, पावसाची माहिती, कृषी विभागाची माहिती- पिक परिस्थीती, खते, पीएम श्री शाळा, शिक्षण विभाग या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी श्री. देओल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या बैठकीस जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी झेनिथ दोंतुला, उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग, अपर जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे, उपजिल्हाधिकारी मानसी पाटील यांच्यासह इतर विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दोन्तुला यांनी जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (घरकुल योजना) योजनेविषयी माहिती देत सांगितले की, याअंतर्गत जिल्ह्यात एकूण 1,37,203 सर्वेक्षणे पूर्ण करण्यात आलेली आहेत. 15 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित ग्रामसभेत कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी (Priority Waiting List) अंतिम करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती यावेळी दिली. जलजीवन मिशन अंतर्गत कामे सुरू असून वर्ष 2026-27 साठी जिल्ह्यातील एकूण घरगुती नळ जोडणी 54110 करणे असल्याची माहिती देण्यात आली. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत होत असलेल्या कामांचा आढावा घेतला आणि यावर्षीच्या मिळालेल्या उद्दिष्टाची पूर्तता करावी, अशा सूचना श्री. देओल यांनी यावेळी केल्या. जलयुक्त शिवार टप्पा 2 अंतर्गत विशेष निधीतून 99.91% आणि अभिसरणातून 98.90% कामे झाली असल्याची माहिती दिली. कुडवा येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सुरू असून सदर महाविद्यालयाला 2013 मध्ये मंजुरी मिळालेली असून आतापर्यंत बांधकाम पूर्ण झाले नसल्याचे सांगण्यात आले असून सदर महाविद्यालयात 60:40 याप्रमाणे केंद्र शासन आणि राज्य शासनाचा हिस्सा आहे. केंद्र शासनाकडून निधीची उपलब्धता नसल्याने कामात अडथळा येत आहे असे श्री. देओल यांना सांगण्यात आले.
जिल्ह्यात वनसंपदा मोठ्या प्रमाणात असून येथे पर्यटनास भरपूर वाव असल्याचे सांगितले. हाजरा फॉल आणि बोदलकसा पर्यटन वाढीला प्रचंड संधी असून वन विभाग याप्रमाणे पावले उचलत असल्याचे श्री. जोंग यांनी सांगितले. यासह वन्य जीव मानव संघर्ष अंतर्गत अपघात झालेल्या व्यक्तींना शासनाच्या ठरवून दिलेल्या मानकानुसार मदत केली जात असल्याचेही सांगितले. यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जनजागृतीचा शिबिरही वन विभागाकडून आयोजित केले जात असल्याचे श्री. जोंग यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात सध्या 32 सारस पक्षांच्या जोड्या असून यांचे सर्वेक्षण शेतकऱ्यांच्या माध्यमातून होत असून त्यांनाही आर्थिक पाठबळ देण्याचे काम केले जात असल्याचे यावेळी सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना-2026 बाबतची जनजागृती शेतकऱ्यांमध्ये करण्यात आलेली असून जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राष्ट्रीयकृत बँकेमध्ये शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम बऱ्यापैकी झालेले असल्याची माहिती दिली आणि प्रथम टप्प्यात 12000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 75 कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा झाली असल्याचीही माहिती जिल्हाधिकारी श्री. पत्की यांनी दिली.
यावर्षी अलनिनोचे सावट असताना सुद्धा गोंदिया जिल्ह्याचे पर्जन्यमान चांगले असून पेरणी वेळेवर झाली आहे. खतांचा तुटवडा जिल्ह्यात नसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. कानवडे यांनी सांगितले. सुरुवातीच्या काळात पाऊस थोडा उशिरा आला, मात्र जिल्ह्यात 96.7% आतापर्यंत पाऊस आलेला आहे. पावसामुळे आतापर्यंत किरकोळ नुकसान झालेले असून नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू आहे.
जिल्ह्यात 21 पीएम श्री शाळा असून या शाळेमध्ये देण्यात येणाऱ्या विशेष सोयी सुविधांमुळे या शाळेतील विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेत मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण झाले असल्याची माहिती देण्यात आली. तसेच या शाळांमध्ये मूलभूत सुविधा चांगल्या असाव्यात याकडे कटाक्षाने लक्ष देण्यासंदर्भात श्री. देओल यांनी यावेळी निर्देशित केले.
केंद्र सरकारशी निगडीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोडून अन्य कुठलाही विषय नसल्याचे सांगण्यात आले. समृद्धी महामार्ग संदर्भातील अधिक्रमण पूर्ण झालेले असल्याची माहिती देण्यात आली. आपले सरकार आणि प्रगती पोर्टलवर येणाऱ्या समस्यांचे निराकरण झपाट्याने होत असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी श्री. पत्की यांनी दिली.
केंद्र शासनाच्या आकांक्षीत जिल्ह्याच्या यादीत गोंदिया जिल्ह्याचे नाव नसून राज्य शासनाच्या यादीत जिल्ह्यातील सालेकसा, सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी व देवरी या तालुक्यातील काही भाग असून शासनाच्या निर्देशाप्रमाणे आणि मूल्यमापनाप्रमाणे या ठिकाणी कामे सुरू आहेत.
नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पाच विभागाकडून काम होत असून याबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला.