“ग्रामविकासाची कामे हीच लोकसेवेची खरी ओळख; प्रतापगडच्या विकासाला प्राधान्य देणार” — आमदार राजकुमार बडोले
अर्जुनी-मोर.-तालुक्यातील ऐतिहासिक प्रतापगड येथे २५ लाख रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या नवनिर्मित ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर १५ ऑगस्ट रोजी आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते, गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार राजकुमार बडोले म्हणाले की, ग्रामपंचायत भवन हे केवळ प्रशासकीय कामकाजाचे केंद्र नसून गावाच्या विकासाचा प्रमुख आधार आहे. नागरिकांना शासकीय सेवा व सुविधा अधिक सुलभतेने मिळाव्यात, तसेच ग्रामविकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी सक्षम ग्रामपंचायत व्यवस्था आवश्यक आहे. प्रतापगडच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ऐतिहासिक प्रतापगड परिसराला विकासाच्या दृष्टीने विशेष महत्त्व असून, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वयाने काम करण्याचे आवाहनही आमदार बडोले यांनी केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी सांगितले की, नवनिर्मित ग्रामपंचायत भवनामुळे ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजाला योग्य सुविधा उपलब्ध झाल्या असून, ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिक चांगली व्यवस्था निर्माण झाली आहे. ग्रामविकासाची कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमा ढेंगे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत गणवीर, पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार, उपसभापती संदीप कापगते, गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी गणेश माली, विस्तार अधिकारी ए.सी. राणे, लिंबाजी कुटे, सरपंच प्रशासक भोजराम लोगडे, ग्रामपंचायत अधिकारी नरेंद्र गोमासे यांच्यासह दीनदयाल डोंगरवार, किशोर तरोणे, योगेश नाकाडे, ठाणेदार ढेकणे, व्यंकट खोब्रागडे, पंचायत समिती सदस्य नूतनलाल सोनवाणे, पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोळे, शारदाताई बडोले, राजहंस ढोक, प्रशांत शहारे, उमेश मडावी, प्रकाश सलामे, छाया डोंगरवार, रेवता गहाणे, सुखदेव कनोजे, नलू हुर्रा, गीता बावणे, हर्षा राऊत, पोलीस पाटील योगेश जनबंधू, मंगेश गायकवाड, नूतन बावणे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनिर्मित ग्रामपंचायत भवनाच्या लोकार्पणामुळे प्रतापगड ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामविकासासाठी आणखी विविध विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.





