25.8 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ मोहगाव बु. येथे ग्रामपंचायत भवनाचा लोकार्पण सोहळा उत्साहात

मोहगाव बु. येथे ग्रामपंचायत भवनाचा लोकार्पण सोहळा उत्साहात

0
15

गोरेगाव,दि.१६ ऑगस्ट:राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान (RGSA) अंतर्गत मोहगाव बु. येथे २५ लाख रुपये निधीतून साकारण्यात आलेल्या नवनिर्मित ग्रामपंचायत इमारतीचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (१४ ऑगस्ट) अत्यंत उत्साहात पार पडला. माजी जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य पंकज रहांगडाले यांच्या शुभहस्ते व प्रशासक ज्योतिका कुंभरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना, “गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा व मागण्या प्राधान्याने पूर्ण केल्या जातील,” असे आश्वासन पंकज रहांगडाले यांनी दिले.या प्रसंगी व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य किशोर पारधी, माजी पं. स. सदस्य साहेबलाल कटरे, प्र. स. उपसरपंच कमलेश्वर रहांगडाले, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष गणराज पटले, माजी सरपंच खेमराज बेदरे आणि ग्रामपंचायत सदस्य तीर्थाबाई राऊत यांच्यासह गावातील सर्व प्रमुख पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुसज्ज इमारतीमुळे कामांना मिळणार गती

प्रस्तावनेत उपसरपंच कमलेश्वर रहांगडाले यांनी गावातील विविध विकासकामांची मांडणी केली. या नवनिर्मित सुसज्ज इमारतीमुळे ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख होण्यास मदत होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन लिपिक बी. सी. बोपचे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार ग्राम अधिकारी एस. बी. तुपटे यांनी मानले.