25.8 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ गडचिरोलीच्या विकासातून संपूर्ण विदर्भाच्या प्रगतीला नवी गती – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

गडचिरोलीच्या विकासातून संपूर्ण विदर्भाच्या प्रगतीला नवी गती – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

0
11
**देशाचा गडचिरोलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला; ‘व्हिजन २०४७’मधून सर्वांगीण विकासावर भर
गडचिरोली, दि. १६ – : एकेकाळी मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गडचिरोलीची ओळख आता वेगाने बदलत असून संपूर्ण देशाचे लक्ष या जिल्ह्याकडे वेधले जात आहे. समृद्ध नैसर्गिक व खनिज संपदा, सुधारत असलेली दळणवळण व्यवस्था, औद्योगिक विकास, शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून गडचिरोली महाराष्ट्रातील आघाडीचा जिल्हा म्हणून पुढे येत आहे. ‘विकसित गडचिरोली जिल्हा–व्हिजन २०४७’च्या माध्यमातून या विकासाला अधिक व्यापक आणि नियोजनबद्ध दिशा मिळेल व गडचिरोलीच्या विकासातून संपूर्ण विदर्भाच्या प्रगतीलाही नवी गती मिळेल, असा विश्वास राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केला.
गडचिरोली येथे आयोजित ‘विकसित गडचिरोली जिल्हा–व्हिजन २०४७’ आराखड्यासंदर्भातील दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, नगराध्यक्षा प्रणोती निंभोरकर, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार डॉ. देवराव होळी, प्रशांत वाघरे, बाबुराव कोहळे,, तसेच योगिता पिपरे, प्रमोद पिपरे, प्रकाश गेडाम, अनंत गुंडळकर, रेखा दोडके, मधुकर भांडेकर व रमेश भुरसे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक व पत्रकार उपस्थित होते.
राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, १९८२ मध्ये स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आलेल्या गडचिरोलीसमोर अनेक आव्हाने होती. मात्र गेल्या दहा-बारा वर्षांत जिल्ह्यात मोठे बदल घडले आहेत. पूर्वी गडचिरोलीत येण्याबाबत असलेली अनास्था आता बदलली असून आज उद्योग उभारण्यासाठी गडचिरोलीत जागा मिळावी, यासाठी उद्योजकांकडून विचारणा होत आहे. हे जिल्ह्याच्या बदलत्या विकासप्रतिमेचे द्योतक आहे.
‘व्हिजन २०४७’ तयार करताना जिल्ह्याची बलस्थाने, कमकुवत बाजू, उपलब्ध संधी आणि भविष्यातील आव्हाने यांचा सर्वंकष विचार होणे आवश्यक आहे. गडचिरोलीचे समृद्ध जंगल, आदिवासी संस्कृती, खनिज संपत्ती, शेती, जलसंपदा आणि कष्टाळू तरुणाई ही जिल्ह्याची मोठी ताकद आहे. या सामर्थ्याचा योग्य उपयोग करून विकासाचा लाभ स्थानिक नागरिकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. या कार्यशाळेमुळे जिल्ह्यातील तरुण, शेतकरी, उद्योजक आणि व्यापाऱ्यांना व्यापक दृष्टिकोन मिळून विकासाच्या मुख्य प्रवाहात अधिक सक्षमपणे सहभागी होता येईल, असे त्यांनी सांगितले