गोरेगांव- विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधुनिकतेची जोड मिळावी व त्यांच्या ज्ञानात भर पडावी, या उद्देशाने तालुक्यातील सटवा येथील जिल्हा परिषद शाळा येथील शिक्षकांनी स्वखर्चातून ‘मॉडेल क्लास रूम ‘ तयार केले असून स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी उद्घाटन करण्यात आले.
शालेय शिक्षण घेताना दिवसेंदिवस विद्यार्थ्यांना अपडेट व्हावे लागत असते. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांना ते सहज शक्य व्हावे, या दृष्टीने मुख्याध्यापक त्रिलोक चौधरी यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळा सटवा येथे ‘मॉडेल क्लास रूम ‘ तयार करण्याबाबत नियोजन करण्यात आले. यात सहाय्यक शिक्षक देवेंद्र धपाडे, सहायक शिक्षिका रेणुका जोशी, प्रतिभा चौधरी, प्राजक्ता चारमोडे यांनी सहकार्य दर्शवित आर्थिक मदत देण्याचे नियोजन केले. त्यानुसार 30 हजार रुपये मॉडेल क्लास रूम ‘ तयार करण्यात आले. या मॉडेल क्लास रूम ‘ चे उद्घाटन 15 ऑगस्ट रोजी करण्यात आले. यावेळी सरपंच अर्चना ठाकूर, पोलीस पाटील टिकाराम रहांगडाले, तंटामुक्त समिती अध्यक्ष रवींद्र कटरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र रहांगडाले, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष भागचंद्र रहांगडाले, सेवानिवृत्त शिक्षक चंद्रशेखर कटरे, उमराव कडूकार, धर्मराज ठाकूर, महादेव राणे, भोजराज बघेले, नितीन कटरे, ओमेंद्र ठाकूर, कन्हैयालाल कोल्हे, भुमेश्वरी पटले, बेनु बाई टेंभरे, रेवण ठाकरे, महेंद्र पटले यांच्यासह माता पालक संघाचे सदस्य उपस्थित होते.





