गोंदिया, दि. १९ ऑगस्ट – राष्ट्रीय सेवा योजना, धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय, गोंदिया, वन विभाग, गोंदिया आणि हिरवळ संस्था, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज कुडवा येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव तथा राज्यसभा खासदार राजेंद्र जैन, संस्थेचे संचालक निखिल जैन आणि धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मनोज पटले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाला वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत हुमणे, क्षेत्र सहाय्यक मुकेश भांडारकर, प्राणीशास्त्र विभागप्रमुख, डॉ. गुणवंत गाडेकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. राजकुमार पटले, डॉ. कल्पना घोषाल, GIS तज्ज्ञ सुमायला सय्यद, हिरवळ संस्थेचे अध्यक्ष रुपेश निंबार्ते , आशिष दुबे, छत्रपाल चौधरी, तसेच वन विभागाचे कर्मचारी सुभाष थेर, मुकेश मेहर, रुपेश चंदेल, चंदन चांदा, रूपचंद बल्ले आदी उपस्थित होते.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत हुमणे यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देताना वृक्षांमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. वृक्षसंवर्धनामुळे परिसर सुंदर, स्वच्छ आणि निरोगी राहतो, असे त्यांनी सांगितले.डॉ. गुणवंत गाडेकर यांनी विद्यार्थ्यांना वाढदिवस साजरा करताना प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. वृक्ष लावणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून भावी पिढीसाठी पर्यावरण सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन डॉ. कल्पना घोषाल यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. राजकुमार पटले यांनी केले. या वृक्षारोपण कार्यक्रमात १२० हून अधिक राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.





