डॉ. दंदे फाउंडेशनचे आयोजन
नागपूरःडॉ. दंदे फाऊंडेशनच्या वतीने ‘इज द ज्यूडिशिअरी ए होली काऊ?’ (‘पवित्र’ मानल्या जाणाऱ्या न्यायपालिकेवर टीकाटिप्पणी होऊच नये काय?) या गंभीर विषयावर सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि. २२ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता वनामती सभागृहात हा कार्यक्रम होईल. डॉ. दंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे यांनी संगितले, की, न्या. ओक हे सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती आहेत. मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती पदावर ते कार्यरत होते. कर्नाटक उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती या नात्याने त्यांनी सेवा दिली. सर्वोच्च न्यायालयात सेवानिवृत्तीच्या दिवशी १० प्रकरणांवर निर्णय देऊन त्यांनी वेगळा विक्रम नोंदवला. स्वतंत्र आणि निष्पक्ष न्यायालयीन निर्णय देण्याकरिता न्या. अभय ओक ओळखले जात असत.
या व्याख्यानाबद्दल अधिक माहिती देताना डॉ. दंदे यांनी स्पष्ट केले, की, मद्रास उच्च न्यायालयाने एका खटल्याचा निर्णय देताना न्यायव्यवस्थेबद्दल स्पष्ट निरीक्षणे नोंदविली. या खटल्यादरम्यान न्यायमूर्तींनी म्हटले की, न्यायाधीशांना होली काऊ (पवित्र गाय) समजण्याची गरज नाही. न्यायपालिकेतही भ्रष्टाचार आहे. सामान्य माणसांच्या स्पष्ट आणि आदरयुक्त प्रतिक्रिया किंवा नागरिकांनी केलेल्या छाननीला न्यायपालिकेने सामोरे गेले पाहिजे, असा न्यायमूर्तींच्या प्रतिपादनाचा आशय होता.
मद्रास उच्च न्यायालयाच्या या निरीक्षणावर सर्वत्र, विशेषत: न्याय वर्तुळात मोठी चर्चा आहे. ही चर्चा तर्कशुद्ध आणि विधायक पद्धतीने झाली पाहिजे. न्यायपालिकेवर सरसकट दोषारोपण करणाऱ्या प्रवृत्ती आणि लोकशाहीचा एक मजबूत स्तंभ असूनही न्यायपालिकेच्या कार्यपद्धती आणि जबाबदारीवर समाजात असलेले मौन अशी दोन टोके या विषयाला आहेत. त्यामुळे लोकशाही व समाजाप्रति संवेदनशील असलेल्या कायद्याच्या क्षेत्रातील नामवंतांनी ही चर्चा केली पाहिजे, याच हेतूने हे व्याख्यान आयोजित केल्याचे डॉ. दंदे म्हणाले.
मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायव्यवस्थेवरील या प्रतिक्रियेमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्यायालयीन जबाबदारी, न्यायालयाच्या अवमानाच्या मुद्द्यांवर कायद्याचा समतोल आदी अनेक मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या आणि अशा संबंधित सर्व मुद्द्यांवर सांगोपांग चर्चा झाली पाहिजे. न्यायव्यवस्था आणि कायदा क्षेत्रातील मान्यवरांनी या बाबतीत मंथंन करुन जनतेचे प्रबोधन करावे, याकरिता डॉ. दंदे फाउंडेशन हे आयोजन करीत असल्याचे डॉ. दंदे यांनी स्पष्ट केले. हे व्याख्यान न्याय आणि कायदा क्षेत्रातील मान्यवरांसह सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, वैद्यक, अभियांत्रिकी आदी सर्व क्षेत्रांतील व्यासंगी नागरिकांना खुले असल्याचेही डॉ. दंदे यांनी स्पष्ट केले.





