अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी
गोंदिया, दि. १९ : पारोडा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायत अधिकारी पी.एन. पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेचा महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना, शाखा गोंदिया यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. कर्तव्य बजावत असलेल्या शासकीय अधिकाऱ्याचा अशा प्रकारे मृत्यू होणे ही अत्यंत वेदनादायी व गंभीर बाब असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शासनाने तातडीने ठोस सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.
यासंदर्भातील निवेदन राज्य शासनाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. जेनित चन्द्रा दोन्तुला (भा.प्र.से.) यांच्या माध्यमातून पाठविण्यात आले आहे. ग्रामपंचायत स्तरावर शासनाच्या विविध योजना व विकासकामांची अंमलबजावणी करताना ग्रामपंचायत अधिकारी व इतर शासकीय अधिकारी-कर्मचारी हे नागरिकांच्या सेवेसाठी कर्तव्य बजावत असतात. मात्र, कर्तव्य बजावत असतानाच अधिकाऱ्यावर हल्ला होऊन त्याचा जीव जाणे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
ग्रामपंचायत अधिकारी हा शासनाच्या विविध योजना, विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा दुवा आहे. अशा परिस्थितीत अधिकारी-कर्मचाऱ्यांना निर्भयपणे व सुरक्षित वातावरणात कर्तव्य बजावता यावे, यासाठी शासनाने प्रभावी सुरक्षा व्यवस्था निर्माण करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या घटनेतील दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारचे हल्ले होणार नाहीत, यासाठी शासनाने प्रतिबंधात्मक व प्रभावी सुरक्षा उपाययोजना तातडीने लागू कराव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.
महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना, शाखा गोंदिया या संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकारिणीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे हे मुख्य सल्लागार, तर प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर या मुख्य सल्लागार मंडळातील पदाधिकारी म्हणून समाविष्ट आहेत. तसेच अध्यक्ष एफ. आर. कुतिरकर उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य , सचिव डी. एस. लोहबरे गट विकास अधिकारी, उपाध्यक्ष एम. एम. वासनिक उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत , श्री वैद्य, श्री विजय लोंढे गट विकास अधिकारी गोंदिया यांचा शिष्टमंडळ मध्ये समावेश होता .
कर्तव्य बजावताना जीव गमावलेल्या स्वर्गीय पी.एन. पाटील यांना संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात संघटना सहभागी असल्याचेही निवेदनातून नमूद करण्यात आले आहे.
“शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना निर्भय व सुरक्षित वातावरणात कर्तव्य बजावता यावे, ही शासनाची जबाबदारी आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासनाने तातडीने प्रभावी सुरक्षा उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना, शाखा गोंदिया यांनी केली आहे.





