गोंदिया, दि.20 : दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी जागतिक डास दिवस (World Mosquito Day) साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे डासांमुळे होणाऱ्या आजारांबद्दल आणि त्यापासून बचाव करण्यासाठी सर्वांना जागरूक करणे. डासांपासून पसरणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, मेंदुज्वर(जे.ई.), झिका व्हायरस, यलो फिव्हर आणि चिकुनगुनिया यांचा समावेश असुन डासांपासून संरक्षण हाच एकमेव उत्तम उपाय असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी दिली.
सन 1887 मध्ये सर रोनाल्ड रॉस, भारतामध्ये कार्यरत लष्करी सर्जन यांनी शोधून काढले की, मलेरिया हा डासांमुळे पसरणारा रोग आहे. रोनाल्ड रॉस यांच्या शोधामुळे डासांमुळे होणारे आजार आणि त्यांच्या उपचारांवर प्रकाश पडला. त्यांना 1902 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कारही मिळाला होता. त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस दरवर्षी साजरा केला जाऊ लागल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी दिली.
भारतात आढळणारे प्रमुख डासांचे प्रकार आणि डासांमुळे होणारे प्रमुख आजार : मलेरिया (Malaria), डेंग्यू (Dengue), चिकुनगुनिया (Chikungunya), झिका व्हायरस (Zika Virus), यलो फिव्हर (Yellow Fever).
पावसाळ्याच्या दिवसात आणि साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होते. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी भारतात प्रामुख्याने आढळणारे डासांचे प्रकार आणि त्यांच्यामुळे होणारे आजार याबद्दल माहिती खालीलप्रमाणे आहे:
ॲनोफेलीस डास : हा डास प्रामुख्याने हिवताप (मलेरिया) या आजाराचा प्रसार करतो. या डासाची मादी जेव्हा निरोगी माणसाला चावते, तेव्हा प्लाझमोडियम नावाचा जिवाणू शरीरात प्रवेश करतो. हा डास सामान्यतः रात्रीच्यावेळी किंवा पहाटेच्या सुमारास जास्त सक्रिय असतो. स्वच्छ आणि साचलेल्या पाण्यात या डासांची पैदास होते. लक्षणे : थंडी वाजून तीव्र ताप येणे, डोकेदुखी आणि अंगात थरथरी सुटणे.
एडिस इजिप्ती डास : या डासाला टायगर मॉस्किटो असेही म्हटले जाते, कारण याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात. हा डास डेंग्यू, चिकनगुनिया, झिका व्हायरस आणि पिवळ्या तापासारख्या धोकादायक आजारांना कारणीभूत ठरतो. हा डास प्रामुख्याने दिवसा आणि उजेडात चावतो. घरात किंवा घराभोवती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात (उदा. कुलर, टायर्स, कुंड्या, पाण्याच्या टाक्या) हा डास अंडी घालतो.
लक्षणे : तीव्र ताप, सांधेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे आणि अंगावर रॅशेस (पुरळ) येणे
क्युलेक्स डास : या डासामुळे हत्तीरोग (Filariasis) आणि मेंदूज्वर (Japanese Encephalitis) यांसारखे गंभीर आजार होतात. हा डास प्रामुख्याने संध्याकाळच्यावेळी आणि रात्री जास्त चावतो. दूषित पाणी, सांडपाणी आणि गटारांमध्ये या डासांची उत्पत्ती अतिशय वेगाने होते.
लक्षणे : हात किंवा पाय हत्तीच्या पायासारखे जाड व सुजलेले दिसणे, तीव्र ताप आणि मानसिक संभ्रम.
डासांपासून बचाव करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स : साचलेले पाणी नष्ट करा: घराभोवती पाणी साचू देऊ नका. दर शनिवारी कोरडा दिवस पाळा. मच्छरदाणीचा वापर: रात्री झोपताना मच्छरदाणीचा नियमित वापर करा. पूर्ण कपडे वापरा: लहान मुलांना आणि स्वतः शरीराचा जास्तीत जास्त भाग झाकेल असे कपडे वापरा. खिडक्यांना जाळ्या: घरात डास येऊ नयेत म्हणून खिडक्यांना जाळ्या बसवून घ्या.
प्रतिबंध व बचाव : तुमच्या घराच्या आजूबाजूला आणि आत पाणी साचू देऊ नका. जिथे जिथे पाणी साचते तिथे डासांची उत्पत्ती होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळेच पावसाळ्यात अनेकांना डेंग्यू आणि मलेरियाची लागण होते. लोक अनेकदा फ्रीजच्या खाली असलेल्या ट्रेकडे तसेच झाड कुंडी, फुलदाणीमध्ये साचलेल्या पाण्याकडे दुर्लक्ष करतात, जे हळूहळू डासांचे घर बनू लागते. म्हणुन फ्रीजचा ट्रे व फुलदाणी 3-4 दिवसातून एकदा स्वच्छ करा. तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल जेथे पाणी साचलेले असेल किंवा रिकामा भूखंड असेल तर लोकसहभागाच्या मदतीने ही ठिकाणे बंद करण्याचा प्रयत्न करा किंवा साचलेले पाणी वाहते करा. घरात टिन-पेटी, टायर, कंटेनर असेल तर त्यामध्ये पाणी साचू देऊ नका. डेंग्यू होऊ नये म्हणून सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. डेंग्यू हा डेंग्यूच्या डासाच्या चावण्याने होतो, त्यामुळे स्वतःला शक्यतो डासांपासून दूर ठेवा. पूर्ण कपडे घालण्याचा प्रयत्न करा जेणेकरून डास तुम्हाला चावणार नाहीत. घराभोवती पाणी साचू देऊ नका. झोपताना मच्छरदाणीचा वापर करा. अंगाला लावण्याचे मलम (Repellents) वापरा. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला.





