25.9 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home विदर्भ अखेर मुहूर्त ठरला! साडेचार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवेगावबांध येथे ‘पुस्तकाचे गाव’ दालनाचे उद्या...

अखेर मुहूर्त ठरला! साडेचार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवेगावबांध येथे ‘पुस्तकाचे गाव’ दालनाचे उद्या लोकार्पण

0
8

खेमेंद्र कटरे / गोंदिया: वाचन चळवळ अधिक समृद्ध करण्यासाठी आणि ग्रामीण भागात साहित्याचा गंध पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने घोषित केलेल्या गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथील ‘पुस्तकाचे गाव’ प्रकल्पाला अखेर साडेचार वर्षांनंतर मुहूर्त मिळाला आहे. प्रस्तावित १० दालनांपैकी पूर्णत्वास आलेल्या पहिल्या सुसज्ज दालनाचे लोकार्पण शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी पार पडत आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे स्वतः नवेगावबांध येथे उपस्थित राहणार आहेत.पुस्तकाचे गाव दालन सुरु होण्यासंदर्भात सातत्याने वृत्तपत्रांनी शासनाचे लक्ष वेधण्याचे काम केले आहे.

घोषणेपासून अंमलबजावणीपर्यंतचा प्रदीर्घ प्रवास

सातारच्या ‘भिलार’च्या धर्तीवर पूर्व विदर्भातील पर्यटनस्थळ असलेल्या नवेगावबांध येथे २५ मार्च २०२२ रोजी ‘पुस्तकाचे गाव’ योजनेस मंजुरी देण्यात आली होती. तत्कालीन सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार छत्रपती संभाजीनगरचे वेरूळ, सिंधुदुर्गचे पोभुले आणि सांगलीचे अंकलखोप यांच्यासह नवेगावबांधची निवड झाली.

मात्र, मंजुरीनंतर तब्बल दोन वर्षे सरकारी पातळीवर कोणतीही ठोस हालचाल झाली नाही. स्थानिक ‘नवेगावबांध फाउंडेशन’ आणि ग्रामस्थांनी यासाठी सतत पाठपुरावा केला. ग्रामस्थांचा वाढता रोष पाहता ४ सप्टेंबर २०२४ रोजी निविदा प्रक्रिया पार पडली. नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान उद्घाटनाची अपेक्षा होती, मात्र तीही फोल ठरली होती. अखेर सर्व अडथळे पार करत पहिल्या दालनाचे उद्घाटन होत असल्याने परिसरात साहित्यानंदाचे वातावरण आहे.

प्रकल्पाची महत्त्वाची वैशिष्ट्ये:

  • सुसज्ज पहिले दालन: गोठणगाव मार्गावरील रामदास बोरकर यांच्या निवासस्थानी हे पहिले दालन तयार करण्यात आले आहे.
  • पुस्तकांचा संग्रह: या दालनात सुमारे १,००० हून अधिक विविध विषयांवरील पुस्तके, कपाटे, आसनव्यवस्था आणि आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे.
  • साहित्य समृद्धी: संत साहित्य, कादंबरी, ललित, चरित्र-आत्मचरित्र, स्त्री साहित्य, क्रीडा आणि बालसाहित्य अशा विविध प्रकारच्या ग्रंथांची मेजवानी पर्यटकांना व वाचकांना मिळणार आहे.
“पुस्तकांचे गाव म्हणून निवड झाल्यानंतर काम रेंगाळले होते. परंतु, आम्ही स्वतःचे एक दालन या उपक्रमासाठी उपलब्ध करून दिले. मराठी भाषा विभागाचे संचालक श्यामकांत देवरे, माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले यांनी यापूर्वी पाहणी केली होती. आता खुद्द मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या दालनाचे लोकार्पण होत असल्याचा आनंद आहे.”
— रामदास बोरकर (अध्यक्ष, नवेगावबांध फाउंडेशन)

नवेगावबांध येथे येणाऱ्या पर्यटकांना निसर्गाच्या साखळीसोबतच आता उत्तम साहित्याची मेजवानीही मिळणार असून, उर्वरित ९ दालनेही लवकरच पूर्ण होऊन वाचकांच्या सेवेत दाखल होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.